केळवे - माहीम/पालघर : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवणूक केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी पंचवीस सभा घेण्याची नामुष्की आली असून मतदार आता त्यांच्या भूलथापांवर विश्वास ठेवणार नाही अशी प्रखर टीका बुधवारी काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी पालघर येथे केली. महाराष्ट्रावर पुन्हा काँग्रेसचेच राज्य येणार असा विश्वास व्यक्त केला.काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांची आज पालघरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यांच्या कार्यपद्धतीवर प्रखर टिका केली. लोकसभा निवडणुकीवेळी महागाई, भ्रष्टाचार, कमी करण्याचे व काळे धन विदेशातून परत आणण्याच्या गर्जना करणाऱ्या भाजपाने मागील चार महिन्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर व कर वाढविले असून भ्रष्टाचारात वाढ व काळे धन परत येऊ शकले नाही. अशी भूमिका घेतल्याने लोकांचा या पक्षावरील विश्वास उडाला असून सीमेवरील गोळीबारबाबत एक चकार शब्द न काढणाऱ्या व राम मंदिराची स्वप्ने दाखवणाऱ्या या पक्षाने आता प्रथम शौचालय मग राम मंदिर अशी भूमिका बदलून जनतेची फसवणूक केल्याची टीका राणे यांनी केली.महाराष्ट्राला तोडणार नाही अशी भाष्य करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँक मुख्यालय, मुंबई गोदी, पालघर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, गुजरात मध्ये नेऊन महाराष्ट्राचा कोणता विकास साधणार आहेत असा सवाल करत मोदींनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याचे राणे म्हणाले. शिवरायांच्या आशीर्वादाने निवडणुकांसाठी प्रसिद्धी करणाऱ्या मोदींनी केंद्रीय अर्थसंकल्पात गुजरात मधील सरदार पटेलांच्या स्मारकासाठी दोनशे कोटीची तरतूद केली मग महाराष्ट्रातील शिवछत्रपतीच्या स्मारकासाठी पाच ते दहा कोटीची तरतूद का केली नाही असे विचारून आता ही ढोंगबाजी बंद करण्याचा सल्ला दिला.आपल्या भाषणात त्यांनी सेनेवरही टीका केली. व शिवसेनेने महाराष्ट्रात २८८ जागांवर उमेदवार न मिळाल्याने निष्ठावंताना डावलून इतर पक्षातील भाडोत्री उमेदवार उभे केल्याचे सांगितले. (वार्ताहर)
पुन्हा काँग्रेसचेच सरकार - राणे
By admin | Updated: October 9, 2014 01:10 IST