Join us

उद्धव ठाकरेंच्या मतांशी काँग्रेस सहमत - सावंत

By admin | Updated: May 5, 2017 06:30 IST

उत्तर प्रदेशात योगी तर महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार आहे, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मताशी काँग्रेस पक्ष सहमत

मुंबई : उत्तर प्रदेशात योगी तर महाराष्ट्रात निरुपयोगी सरकार आहे, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मताशी काँग्रेस पक्ष सहमत आहे, असा टोला काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी लगावला आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख ठाकरे यांनी राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर सडकून टीका केली होती. त्यावर सावंत म्हणाले, राज्यातील सरकारची विश्वासार्हता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अतिशय उग्र झाला आहे. या सर्व परिस्थितीमुळे जनतेत असंतोष वाढत चालला आहे. सत्तेत सहभागी असलेले सहयोगी पक्ष जनतेचा असंतोष पाहून सरकारविरोधात आंदोलन करू लागले आहेत. या आंदोलनात ज्या प्रकारचे शब्द वापरले जात आहेत ते पाहता सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर बेबनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रीच सरकारविरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत. अशा तऱ्हेचे विदारक आणि विसंवादी चित्र महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दिसले नाही. शिवसेना व इतर घटक पक्षांनी या निरुपयोगी सरकारमध्ये निरुपयोगी होऊन राहण्यापेक्षा तत्काळ बाहेर पडून आपण काहीतरी उपयोगी आहोत, हे जनतेला दाखवून द्यावे, असे आव्हानही सावंत यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)