Join us

मुंबईतील कुपोषित बालकांना काँग्रेस घेणार दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:06 IST

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील झोपडपट्टया, तसेच आदिवासी पाड्यातील एक हजार कुपोषित बालकांना दत्तक ...

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील झोपडपट्टया, तसेच आदिवासी पाड्यातील एक हजार कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना सुदृढ करण्याचा संकल्प मुंबई काँग्रेसने केला आहे. शनिवारी प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे.

मुंबईतील कुपोषित बालकांच्या औषधोपचाराची जबाबदारी मुंबई काँग्रेस घेणार आहे. या एक हजार कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी त्यांना पौष्टिक आहार देण्याची व त्यांच्या औषधोपचाराची सर्व जबाबदारी मुंबई काँग्रेसने घेतलेली आहे. यासाठी मुंबईच्या सहा जिल्ह्यांमध्ये मुंबई काँग्रेसचे २०० पदाधिकारी स्वयंसेवक म्हणून नेमले जाणार आहेत. या प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे पाच बालकांची जबाबदारी असणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

तसेच, राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एक हजार बॉटल्स रक्त संकलित केले जाणार आहे. मुंबई काँग्रेसने यापूर्वी ११ एप्रिल ते २३ मे २०२१ पर्यंत संपूर्ण मुंबईत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांदरम्यान ७००० बॉटल्स रक्त संकलित करण्यात आले होते. त्यातील ९५% रक्त हे सरकारी रुग्णालये व रक्तपेढ्यांना देण्यात आले तसेच ५% टक्के रक्ताचा पुरवठा खासगी रुग्णालयांना करण्यात आला होता. उद्याचे रक्तदान शिबिर हे कुलाबा, धारावी, मालाड पश्चिम व वर्सोवा या विधानसभा क्षेत्रात होणार असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.