Join us  

मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल काँग्रेसकडून नौदलाचे अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 7:44 PM

मुंबईच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे पत्र लिहून भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.  

 मुंबई   - मुंबईच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे पत्र लिहून भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे.  २६/११/२००८ रोजी मुंबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास 166 लोकांचा मृत्यू झाला आणि तीनशेपेक्षा अधिक लोक जखमी झाले. भारतमातेचे शूरवीर सुपूत्र असलेले लष्करी अधिकारी आणि पोलीस यांनी मुंबईच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे हे या हल्ल्यातून व वेळोवेळी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून स्पष्ट झाले आहे. त्यातही २६/११ चा दहशतवादी हल्ला समुद्रमार्गे झाला होता. त्यामुळे अशाच त-हेचा समुद्रमार्गाचा वापर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याकरिता पुन्हा होऊ शकतो, हे गुप्तचर विभागाच्या अनेक अहवालातून स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुख लक्ष्यांमध्ये मुंबई अग्रस्थानी आहे हे ही स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षिततेकरिता कोणतीही हयगय होता कामा नये हे अभिप्रेत असणे सहाजिकच आहे. याच अनुषंगाने २६/११ च्या हल्ल्यानंतर अधिक सतर्कता अभिप्रेत असल्याप्रमाणे नौदलाने ब-याच अंशी दक्षता घेत सागरी प्रहारी बल स्थापन केले आहे.  

मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आपण हेलिपॅड असेल वा तरंगते हॉटेल सारख्या प्रकल्पांना आक्षेप घेऊन आपली जबाबदारी पार पाडल्याबद्दल नौदलाचे या पत्राद्वारे अभिनंदन केले. सदर प्रकल्पाचा लाभ कोणत्याही सामान्य मुंबईकरांना अभिप्रेत नाही. नौदलाने राष्ट्रीय सुरक्षिततेकरिता कोणी कितीही मोठा असेल तरी कोणत्याही दबावाखाली येऊ नये हीच भारतीय जनतेची अपेक्षा आपल्या माध्यमातून पूर्ण होत आहे असे या पत्रात म्हटले आहे. भारताच्या जनतेला आणि काँग्रेस पक्षाला भारतीय नौदलाचा प्रचंड अभिमान आहे. आपण आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करित आहात याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे असे सचिन सावंत यांनी काँग्रेस पक्षातर्फे लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :इंडियन नॅशनल काँग्रेसभारतीय नौदल