जयंत धुळप, अलिबागरायगड जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या चारही पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांमध्ये गेल्या २० सप्टेंबरला निवडणूक आचारसंहिता लागल्यापासून निर्माण झालेली संभ्रमावस्था अद्याप कायम आहे. जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड विधानसभा मतदार संघांतील निवडणुकीच्या निमित्ताने युती वा आघाडीच्या पक्षांची बैठक देखील होवू शकलेली नाही. परिणामी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कोणाचा कोणत्या राजकीय पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल होणार याबाबतची उत्सुकता मतदारांपेक्षा राजकीय पक्ष कार्यकर्त्यांमध्येच अधिक दिसून येत आहे.उमेदवार जाहीर करण्यात शेतकरी कामगार पक्षाने यावेळी आघाडी घेवून उरणमध्ये आमदार विवेक पाटील, पनवेलमध्ये बाळाराम पाटील, पेणमध्ये आमदार धैर्यशील पाटील तर अलिबागमध्ये सुभाष तथा पंडितशेठ पाटील या आपल्या चार प्रमुख उमेदवारांची उमेदवारी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या समन्वयातून रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि काँग्रेस अशी आघाडी झाली आणि अध्यक्ष राष्ट्रवादीचे तर उपाध्यक्ष शेकापचे झाले. या आघाडीअंती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या पोटात भीतीचा गोळाच निर्माण झाला. आता विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि काँग्रेस अशीच आघाडी झाली तर उरण, पनवेल, पेण व अलिबागमध्ये शेकाप उमेदवार पंडित पाटील यांचे प्रचारकार्य करायचे का,असा प्रश्न निर्माण झाला आहे.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली फसवणूक केल्याचा दावा करून पनवेलचे काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर भाजपामध्ये प्रविष्ट झाले तर जि.प.अध्यक्षपद आपल्याला देतो असा शब्द देवून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी आपल्याला दुसऱ्यांदा फसवल्याचा जाहीर आरोप करून राष्ट्रवादी काँगे्रसचे जि.प.मधील प्रतोद आणि ताकदीचे नेते महेंद्र दळवी आणि ज्येष्ठ जि.प. सदस्य अॅड. राजीव साबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे अलिबाग विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार म्हणून महेंद्र दळवी अर्ज दाखल करतील असे अपेक्षित आहे. युती-आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने आणि आता मनसेनेही आपली उमेदवारांची यादी स्पष्ट केल्याने, अखेरपर्यंत तळ्यात मळ्यात अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात संभ्रमावस्था
By admin | Updated: September 26, 2014 23:48 IST