Join us
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्राबाहेर गोंधळ कायम, लाभार्थ्यांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:08 IST

मुंबई – मुंबईसह राज्यभरात १६ जानेवारीपासून लसीकरण प्रक्रिया सुरु झाली. काहीसा थंड प्रतिसाद नंतर काही दिवसांनी लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी गर्दी ...

मुंबई – मुंबईसह राज्यभरात १६ जानेवारीपासून लसीकरण प्रक्रिया सुरु झाली. काहीसा थंड प्रतिसाद नंतर काही दिवसांनी लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. मात्र केंद्राकडून सातत्याने लसीचा पुरवठ्यात कमतरता आढळल्याने लसीकरण प्रक्रियेत खंड पडू लागला, परिणामी वारंवार हे घडत असल्याने पालिकेने लसीकरण प्रक्रिया तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र दिवसभरात शहर उपनगरातील लसीकरण केंद्रांवर एकच गोंधळ दिसून आला, शिवाय उन्हात कित्येक तास थांबूनही लस न मिळाल्याने लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

लसीकरणातील नियोजनाचा अभाव, लसींच्या कुप्यांचा अपुरा पुरवठा, लसीकरणासाठी नोंदणी करूनही लस मिळत नसल्यामुळे हवालदिल झालेले नागरिक, तर काही लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रांवरील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे सर्वत्र गोंधळाचे चित्र होते. काही ज्येष्ठ नागरिकांची पहिली मात्रा घेऊन ५० दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे. नागरिक सलग पाच ते सहा दिवस सतत चार ते पाच तास रांगेत थांबूनही त्यांना लस मिळत नाही.

जम्बो कोविड केंद्रांवर अधिक गर्दी

पश्चिम उपनगरातील वांद्रे कुर्ला संकुल, गोरेगाव येथील नेस्को कोरोना केंद्रावर सकाळपासून नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांपासून ४५ वयोगटावरील अनेक लाभार्थी कडक उन्हात एक-दीड किलोमीटरच्या रांगेत तासनतास उभे होते, परिणामी, वाट पाहूनही लस न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण होते. मुंबईच्या बीकेसी केंद्रावर ५००० तर गोरेगाव केंद्रावर ४२०० डोस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि या केंद्रावर यापेक्षा दुप्पट गर्दी दिसून येत आहेत. गेले काही दिवस महापालिकेला येणारा साठा कमी जास्त प्रमाणात आहे.

वाद तुमचा, भरडले आम्ही जातोय

- नरेंद्र पाटील, कांदिवली

प्रादुर्भावापासून संरक्षण व्हावे याकरिता नोंदणी करुन गोरेगाव येथील केंद्रावर लस घेण्यासाठी गेलो होतो. साडेतीन तास उन्हात वाट पाहिल्यानंतर केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी लसींचे डोस संपल्याचे येऊन कळविले, त्यामुळे संताप झाला. लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून केंद्र आणि राज्य शासनाचा वाद सुरु आहे, पण त्यात सामान्य माणूस म्हणून आम्ही भरडले जातोय, आम्ही कुठे न्याय मागायचा ..यावर कोणाकडे उत्तर नाही.

आप कतार में है

- जयेंद्र पटियाल, खेरवाडी

दोन दिवसापूर्वी वॉक इन लसीकरणासाठी आलो होतो, त्यावेळेस ही रांग कमी झाली, आणि माझा क्रमांक जवळ आला असे वाटत असताना अचानक लस संपल्याचे समोर आले. अडीच तास उन्हात थांबूनही कुटुंबातील चार सदस्य परत फिरलो. त्यानंतर नोंदणीसाठी सातत्याने प्रयत्न करुन ही झाले नाही, त्यामुळे आज पुन्हा लसीकरणासाठी आलो होतो. परंतु तीन तास थांबल्यानंतर लस संपल्याचे समजले. यंत्रणेवर ताण आहे, हे मान्य आहे. मात्र लसीकरण करताना प्रशासनाने बारकाईने नियोजन केले पाहिजे, जेणेकरून केंद्रावरील गर्दी, उन्हाची समस्या, पिण्याच्या पाण्याने हैराण होणे, ज्य़ेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सुविधांचा अभाव या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही

दुसऱ्या डोससाठी ही प्रतीक्षा कायम

- कोमल गद्रे, अंधेरी

दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल असे असूनही दोनदा लसीकरण केंद्रावर जाऊन लस मिळाली नाही. दुसरा डोस घेण्यासाठी ५०- ५५ दिवसांचा कालावधी उलटला आहे, त्यामुळे २-३ दिवस उलटूनही लस मिळाली नाही, आता अजूनही पुढचे तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. याविषयी, लसीकरण केंद्र प्रमुखाला जाब विचारायचा की अन्य यंत्रणेला याबद्दल प्रचंड नाराजी आहे.