सांगली : एलबीटीवरुन (स्थानिक संस्था कर) आघाडीविरुध्द कठोर भूमिका घेणाऱ्या व्यापारी-उद्योजकांनी ऐन निवडणुकीत मात्र तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. एलबीटीबाबत ठोस निर्णय घेणाऱ्या पक्षाबाबत विचार करू, असेही काही जणांनी सांगितले. व्यापारी, उद्योजकांचा सर्वात ज्वलंत प्रश्न ‘एलबीटी’च आहे. जर एलबीटी हटवला नाही, तर आघाडी सरकारविरुध्द मतदान करण्याचा इशाराही एलबीटीविरोधी कृती समितीने घेतला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारविरुध्द निर्णय घेण्यात आला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत व्यापारी, उद्योजकांनी कोणतीही राजकीय भूमिका घेण्याचे टाळले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वीही एलबीटीविरोधी कृती समितीने आघाडी सरकारला हिसका दाखविण्याची भूमिका घेतली होती. मात्र आता निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना व्यापारी संघटनांच्या नेत्यांनी गप्प राहणेच पसंत केले आहे. चेंबर आॅफ कॉमर्समध्ये तसे पाहिले, तर सध्या मदन पाटील गटाची सत्ता आहे. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांचे नेते, सहकारी सुरेश पाटील हे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले आहेत. तिसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी, सराफ असोसिएशनचे पदाधिकारी सुधीर गाडगीळ भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे कोणाची बाजू घ्यायची, यावरुन व्यापारी, उद्योजकांची गोची झाली आहे. विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी आता व्यापारी, उद्योजकांशी संपर्क साधला आहे. एलबीटीसंदर्भात मात्र अद्याप कोणी ठोस आश्वासन दिलेले नाही. निवडणुकीपूर्वी एलबीटीवरुन ओरड करणारे आता थांबले आहेत. एलबीटीविरोधी कृती समितीचे नेते समीर शहा म्हणाले की, निवडणुकीपूर्वी आम्ही आघाडी सरकारविरुध्द रणशिंग फुकले होते. मात्र त्यामागे आमचा प्रश्न मिटावा, हा उद्देश होता. व्यापारी संघटना ही राजकीय संघटना नाही. या निवडणुकीत आम्ही तटस्थ राहणार आहोत. प्रत्येकजण स्वतंत्र आहे. (प्रतिनिधी)चेंबर आॅफ कॉमर्स ही व्यापाऱ्यांची संस्था आहे, राजकीय व्यासपीठ नाही. त्यामुळे या व्यासपीठावरून कोणतीही राजकीय भूमिका जाहीर होणार नाही. व्यापारी आपापली भूमिका घेण्यास स्वतंत्र आहेत. संस्थेत वेगवेगळ्या विचारांचे सभासद आहेत. व्यक्तिगत पातळीवर ते त्यांच्या सोयीनुसार निर्णय घेतील; मात्र एक संस्था म्हणून कोणत्याच पक्षाला आम्ही पाठिंबा जाहीर करणार नाही.- मनोहर सारडा, अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली उद्योजक संघटना राजकारणात उडी घेणार नाही. या निवडणुकीत आम्ही तटस्थ राहू. राजकीय भूमिका घेण्यास प्रत्येकजण स्वतंत्र आहे. औद्योगिक वसाहत संघटना म्हणून आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा जाहीर करणार नाही. तसे अजूनही कोणत्याही पक्षाने व्यापारी, उद्योजकांबाबत धोरण स्पष्ट केलेले नाही. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या उमेदवाराबाबत मात्र विचार करायला हवा.- सचिन पाटील, अध्यक्ष,वसंतदादा औद्योगिक वसाहतउमेदवार व व्यापाऱ्यांचे संबंधचेंबर आॅफ कॉमर्स व मार्केट कमिटीशी काँग्रेसचे मदन पाटील यांचा जवळचा संबंध. पाटील हे मार्केट कमिटीचे संचालकही आहेत. सुधीर गाडगीळ स्वत: सराफी व्यवसायिक आहेत. त्यामुळे व्यापाऱ्याशी त्यांचा संबंध येतोसुरेश पाटील व्यापारी असून चेंबरचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पृथ्वीराज पवार यांनी एलबीटीविरोधात आंदोलनात व्यापाऱ्यांना साथ दिली आहे.
पाठिंब्यावरून व्यापाऱ्यांत संभ्रमावस्था
By admin | Updated: October 2, 2014 22:23 IST