Join us  

कोरोनाचा विषाणू हवेत राहण्याविषयी संभ्रम; वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 6:15 AM

श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सागर निनावे यांनी सांगितले की, आपल्याकडील वातावरणात किंवा रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासात अजूनही हे सिद्ध झालेले नाही.

मुंबई : कोरोनाचे विषाणू हवेत २५ ते ३० फुटांपर्यंत वर जात असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले, एका आंतरराष्ट्रीय अहवालात याविषयी नमूद केले आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांमध्येही संभ्रम आहे. एखादा बाधित खोकल्यास अथवा शिंकल्यास त्याच्या तोंडातून निघणाऱ्या थेंबांमधून हे विषाणू हवेत पसरतात. यादरम्यान एखादा निरोगी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्यास त्याला विषाणूंची बाधा होण्याचा धोका असतो, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. त्यामुळे बाहेर फिरू नका, सुरक्षा साधनांचा वापर करावा, असे ते म्हणाले.

श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सागर निनावे यांनी सांगितले की, आपल्याकडील वातावरणात किंवा रुग्णांच्या वैद्यकीय इतिहासात अजूनही हे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे हवेत कोरोना विषाणू आहे, असे म्हणून नागरिकांत भीती निर्माण होऊ शकते. पण घाबरण्याचे कारण नाही. खबरदारी घेणे गरजेचे आहे.कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे म्हणाले, हवेत हा विषाणू राहतो, त्यातून याचा संसर्ग होण्याचा धोका असतो, याविषयी अजून तरी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. त्यामुळे अधिकाधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईडॉक्टर