Join us

राज्यातील सीए परीक्षेबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

आयसीएआयकडून सूचना नाहीतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील सर्व राज्यांत सीए फाउंडेशन कोर्स जून-जुलै २०२१ ही परीक्षा शनिवारपासून ...

आयसीएआयकडून सूचना नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील सर्व राज्यांत सीए फाउंडेशन कोर्स जून-जुलै २०२१ ही परीक्षा शनिवारपासून घेतली जाणार आहे. मात्र, राज्यात रत्नागिरी, रायगड भागातील पूरपरिस्थिती पाहता ही परीक्षा पुढे ढकलली जाणार का, असा प्रश्न विद्यार्थी, पालक विचारत आहेत. याबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाने कुठलीही अधिकृत सूचना दिली नसल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत.

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाने ५ जुलै रोजी जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे २४, २६, २८ आणि ३० जुलै रोजी सीए फाउंडेशन कोर्स अभ्यासक्रमाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील पूरस्थितीचे वतावरण पाहता अनेक विद्यापीठांनीही आपल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, मात्र आयसीएआयकडून अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचायला अडचणी येणार आहेत, त्यांच्या परीक्षेचे काय? राज्यात कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात परीक्षेची केंद्रे आहेत. त्या ठिकाणी परीक्षा घेतली जात असताना अडचणी येत असतील तर नेमके काय केले जाणार? परीक्षा रद्द झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागणार का, असे प्रश्न विद्यार्थी, पालक उपस्थित करीत आहेत.

यामध्ये कोविड स्थिती पाहता विद्यार्थ्यांना ऑप्ट आऊट पर्याय या वर्षी आधीच देण्यात आला आहे. त्यामुळे असाधारण परिस्थितीत विद्यार्थी जुलैची परीक्षा न देता या ऑप्शनद्वारे नोव्हेंबरमध्ये परीक्षा देऊ शकतात. ३० जुलैपर्यंत विद्यार्थी हा पर्याय निवडू शकणार आहेत.