Join us  

कलाविषयक उपक्रमांसाठी लवकरच कौन्सिल, विनोद तावडे यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 2:27 AM

दि बॉम्बे आर्ट्स सोसायटीची संचालन समिती, कला संचालक (महाराष्ट्र राज्य) आणि मुंबईतील प्रस्थापित चित्रकार व शिल्पकार यांनी नुकतीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली.

मुंबई : दि बॉम्बे आर्ट्स सोसायटीची संचालन समिती, कला संचालक (महाराष्ट्र राज्य) आणि मुंबईतील प्रस्थापित चित्रकार व शिल्पकार यांनी नुकतीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली. या बैठकीदरम्यान राज्यातील कलाशिक्षण व कलाविषयक उपक्रमांसाठी लवकरच कौन्सिलची स्थापना करण्यात येईल, असे आश्वासन चित्र-शिल्पकारांना दिले.या बैठकीत राज्यातील शालेय व उच्च कला शिक्षण, दृककला संवर्धन, कला संस्था व कला उपक्रमांस साह्य निधी, भूषण पुरस्कार अशा अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली. याविषयी तावडे यांना लेखी निवेदनही देण्यात आले. या वेळी कलासंचालक प्रा. राजीव मिश्रा, प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर, दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे संचालक सदस्य प्रा. नरेंद्र विचारे, शिल्पकार अजिंक्य चौलकर, दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे माजी अध्यक्ष शिल्पकार उत्तम पाचारणे, शिल्पकार विक्रांत मांजरेकर आदी उपस्थित होते.बैठकीविषयी दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी सांगितलेकी, १९७९ साली राज्यातील कलाशिक्षण व कलाविषयक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी आर्ट कौन्सिलची स्थापना झाली होती. मात्र १९९४नंतर त्याची पुनर्रचना अद्याप केलेली नाही. ती लवकर अग्रक्रमानेकरावी असे सदस्यांनी सुचविले आणि तावडे यांनी याला मान्यता दिली आहे. शालेय पातळीवर कला शिक्षकांच्या नेमणुकांसंबंधी टप्प्याटप्प्याने सुरुवात करावी. उच्च कला शिक्षणातील अध्यापकांची रिक्त पदे भरण्यात यावीत याकडे चित्र-शिल्पकारांनी तावडे यांचे लक्ष वेधले. राज्य शासनातर्फे राज्य कला प्रदर्शनासाठी आकारण्यात येणारे शुल्क आकारले जाऊ नये अशी मागणी केली आहे.दि बॉम्बे आर्ट्स सोसायटी आणि दि आर्ट सोसायटी आॅफ इंडिया या संस्थांना शासनाने वार्षिक अनुदान साह्य निधी सुरू करावा अशी मागणी कलाकारांनी केली. याविषयी, कौन्सिलच्या स्थापनेनंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे तावडे यांनी आश्वासित केले आहे.त्याचप्रमाणे सर जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सला दीडशे वर्षांची परंपरा आहे, त्याची मांडणी मासिक स्वरूपाने करून त्याला पर्यटन आकर्षण म्हणून विकसित करण्याचा विचार चित्र-शिल्पकारांनी मांडला.आश्वासनाची पूर्तता करावीदि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार व्यावसायिक कलाकारांचा राज्य पुरस्कार रुपये एक लाख व विद्यार्थी गटाचा पुरस्कार रुपये पन्नास हजार सुरू करावा.कला संचालनालयाने हा प्रस्ताव मंत्र्यांच्या आश्वासनानुसार लवकर सादर करावा. तसेच प्रस्थापित दृककलाकारांचा जीवन गौरव पुरस्कार हा भूषण पुरस्काराप्रमाणे सुरू करावा, अशी विनंती दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी तावडे यांना केली.

टॅग्स :विनोद तावडे