Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे आदिवासी रूग्णांचे हाल

By admin | Updated: July 7, 2014 01:34 IST

तालुक्यातील आदिवासी बांधवांना उपचाराकरिता उपलब्ध असलेला कुटीर रुग्णालयाचा पर्यायही सध्या बंद आहे.

जव्हार : तालुक्यातील आदिवासी बांधवांना उपचाराकरिता उपलब्ध असलेला कुटीर रुग्णालयाचा पर्यायही सध्या बंद आहे. मेग्माचा संप असल्यामुळे डॉक्टरांनी गेल्या ४ दिवसांपासून कुटीर रूग्णालयातील ओ.पी.डी. बंद ठेवल्यामुळे शेकडो आदिवासी बांधवांचे हाल होत असून उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे.९९ टक्के आदिवासी असलेल्या जव्हार तालुक्यात एकूण १ लाख ६० हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे रुग्णालयात २५० ते ३५० रूग्ण दाखल होत असतात, परंतु गेल्या ४ दिवसांपासून कुटीर रूग्णालयाचे ओ.पी. डी. बंद असल्यामुळे नाहक गरीब आदिवासी जनतेला शरीराबरोबर आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. खेडापाड्यातून शेकडो रूग्णांचा विचार केला, तर ४ दिवसांत जवळजवळ १००० रूग्णांना खाजगीत उपचार करावा लागला आहे. त्यामध्ये सध्या राज्यात भीषण पाणीटंचाईचे सावट असल्याने खेडोपाड्यातील आदिवासी बांधवांना टायफॉईड, मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. काही गरीब आदिवासी रूग्णांकडे येण्याजाण्यासाठी पैसे नसतात. ते पायपीट करत रूग्णालयात येतात, मात्र त्यांना खाजगी रूग्णालयात उपचार करण्याकरिता पैसेच नसल्याने पदरी निराशाच येत आहे. अशा कित्येक रूग्णांची प्रकृती खालावलेली आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार होत नसल्यामुळे बरा होणारा आजार वाढू लागला आहे. नुकताच जव्हार तालुक्यातील तलासरी खंबाळा गावातील गिरजा सुधाकर गिंभल या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालेला आहे. या संपामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रही सहभाग झालेले आहेत. त्यामुळे खेडापाड्यांवर जे छोटे - मोठे उपचार होत होते ते ही बंद झालेले आहेत. (वार्ताहर)