Join us

भाऊच्या धक्क्यावरील शौचालयाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:06 IST

मुंबई : मुंबईतील जलवाहतुकीचे प्रमुख केंद्र असलेल्या भाऊच्या धक्क्यावरील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवासी, वाहतूकदार आणि मच्छिमार व्यावसायिकांची ...

मुंबई : मुंबईतील जलवाहतुकीचे प्रमुख केंद्र असलेल्या भाऊच्या धक्क्यावरील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवासी, वाहतूकदार आणि मच्छिमार व्यावसायिकांची गैरसोय होत आहे.

मुंबईतून जलमार्गे कोकणात जाण्यासाठी भाऊच्या धक्क्याचा वापर केला जातो. शिवाय मुंबईला मत्स्यपुरवठा करणारे केंद्र म्हणूनही भाऊच्या धक्क्याची ओळख आहे. गेल्यावर्षी रो-रो सेवा सुरू झाल्यापासून येथून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या पाच हजारांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांसह येथे मासेखरेदीसाठी येणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन शौचालयाची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सध्या संचारबंदीमुळे भाऊच्या धक्क्यावरून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच वाहतूक होत आहे. प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे आत्ताच डागडुजीचे काम हाती घेतल्यास फारसे अडथळे येणार नाहीत, असे येथील मच्छिमार व्यावसायिकांनी सांगितले.

.....

फोटोओळ – भाऊच्या धक्क्यावरील शौचालयाची दुरवस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.