मुंबई : काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानातील सभागृहाची मागील दोन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. मैदानातील विविध कार्यक्रमांना उपयोगी पडणाऱ्या सभागृहाचे बांधकाम महानगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. मात्र मागील दोन वर्षांपूर्वी या सभागृहाची दुरवस्था झाली आहे. या सभागृहाला शटर नसल्याने ही वास्तू मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या सभागृहात कोणतेही कार्यक्रम होत नाहीत. परिणामी नागरिकांना कार्यक्रमांसाठी मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर स्टेज व मंडप बांधावा लागत आहे. त्यामुळे मैदानात व्यायामासाठी, खेळण्यासाठी अथवा चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. याप्रकरणी काळाचौकीच्या अभ्युदयनगरमधील रहिवाशांनी तक्रार करूनदेखील या समस्येकडे कोणीच लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशी करीत आहेत. या समस्येची दखल नक्की घेणार तरी कोण, असा सवाल येथे उपस्थित होत आहे. पालिकेने त्वरित या सभागृहाची डागडुजी करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.
शहीद भगतसिंग मैदानातील सभागृहाची दुरवस्था दोन वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:06 IST