सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई - यापुढे वाहनांचे ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी संगणकीय परीक्षा द्यावी लागणार आहे. २९ एप्रिलपासून ही प्रक्रि या उपप्रादेशिक कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे सुमारे दीड हजार जणांनी ही संगणकीय परीक्षा दिली आहे. वाहन परवाना काढणार्यांची यापूर्वी घेतली जाणारी लेखी परीक्षा सध्या संगणकावर होत आहे. याकरिता वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १० संगणकांचा कक्ष बनवण्यात आला आहे. त्याद्वारे एका वेळेस दहा जणांची संगणकीय परीक्षा घेतली जात आहे. दुचाकी, चारचाकी अथवा अवजड अशा कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा चालक परवाना काढण्यासाठी संबंधिताला ही संगणकीय चाचणी द्यावी लागणार आहे. त्यामध्ये विचारल्या जाणार्या १५ पैकी ९ प्रश्नांची उत्तरे बरोबर आली तरच पुढची प्रक्रि या केली जाणार आहे. याकरिता संबंधित व्यक्तीला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे नसल्याचे आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले. ही प्रक्रि या बारामती व अकलूज पाठोपाठ नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. २९ एप्रिलपासून त्याची सुरवात करण्यात आली असून सुमारे दीड हजार जणांनी ही संगणकीय चाचणी दिली आहे. या चाचणीत नापास होणार्यांनाही पुन्हा चाचणी देता येणार असल्याचेही धायगुडे यांनी सांगितले. वाहनाचे लर्निंग लायसन काढण्यापूर्वी होणार्या या चाचणीकरिता आरटीओकडून ४२७ प्रश्नांचा संच तयार करण्यात आला आहे. हे प्रश्न प्रादेशिक परिवहनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यापैकी कोणत्याही १५ प्रश्नांचा सामना वाहन चालक परवान्यासाठी आलेल्यांना चाचणीमध्ये करावा लागणार आहे. या संगणकीय प्रणालीमुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज अधिकच सुरळीत झाले आहे.
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी संगणकीय चाचणी
By admin | Updated: May 20, 2014 02:20 IST