Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालासाठी संगणकप्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण दाखल करण्यासाठी शाळांना मूल्यमापन कार्यपद्धतीची संगणक प्रणाली उद्यापासून उपलब्ध होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीचे अंतर्गत मूल्यांकनाचे गुण दाखल करण्यासाठी शाळांना मूल्यमापन कार्यपद्धतीची संगणक प्रणाली उद्यापासून उपलब्ध होणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र निकाल तयार नसल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांची त्रेधातिरपीट उडाली असून, निकाल सुपूर्द करण्यासाठी मुदत वाढवून मागितली आहे.

राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या दहावीचे मूल्यमापन आराखड्याच्या वेळापत्रकानुसार वर्गशिक्षक आणि विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुणसंकलित करून, निकाल तयार करून तो मुख्याध्यापक आणि शाळेच्या सात सदस्यीय समितीकडे देण्याची मुदत संपली आहे. यापुढे मुख्याध्यापक आणि सात सदस्यीय समितीने तो प्रमाणित करून ३१ जूनपर्यंत मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रणालीमध्ये आणि विभागीय मंडळाकडे सुपूर्द करणे अपेक्षित आहे. मात्र अद्यापही वर्ग शिक्षकांकडूनच निकाल तयार नसल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मुदत वाढवून मागितली आहे.

दहावीच्या परीक्षा रद्द केल्या नव्हत्या, तेव्हा लेखी परीक्षा झाल्यानंतर शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्यात अशा सूचना शिक्षण विभाग व राज्य शिक्षण मंडळाने दिल्या होत्या. यामुळे अनेक शाळांनी आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. दरम्यान, लेखी परीक्षा होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक कुटुंबे गावी गेली. त्यामुळे आता विद्यार्थी संपर्क क्षेत्रात नाहीत. या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे ? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

शिक्षकांचा लोकल त्रास सुरूच

अद्यापही शिक्षकांना लोकल प्रवासाची परवानगी मिळत नसल्याने, तिकीट मिळत नसल्याने मुख्याध्यापक हतबल झाले आहेत. आमच्या शाळेतील दूरवरून येणाऱ्या दहावीच्या शिक्षकांना खाजगी वाहने करून, स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून शाळेत यावे लागत आहे. यात वेळ वाया जात असल्याने निकालाच्या कामालाही वेळ लागत असल्याची तक्रार मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी केली.