Join us

संगणकीय ज्ञानापासून ते विद्यार्थीही वंचितच!

By admin | Updated: July 11, 2015 23:31 IST

सध्याच्या काळात संगणकीय ज्ञान महत्त्वाचे असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित असल्याचे चित्र बहुतांश शाळांमध्ये पाहावयास मिळते.

प्रशांत माने,कल्याण सध्याच्या काळात संगणकीय ज्ञान महत्त्वाचे असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित असल्याचे चित्र बहुतांश शाळांमध्ये पाहावयास मिळते. समाजापासून वंचित असलेल्या कुष्ठरुग्णांची मुले शिकत असलेल्या क्रांतिवीर राजगुरू प्राथमिक शाळेतही हे वास्तव आहे. या शाळेला मुंबईतील एका शाळेने पुरविलेले संगणक तज्ज्ञ शिक्षकांअभावी धूळखात पडले आहेत.डोंबिवलीनजीकच्या कचोरे, पत्रीपूल येथील हनुमाननगरातील कुष्ठरुग्ण वसाहतीत ही शाळा आहे. वसाहतीत कुष्ठरुग्णांची १४० कुटुंबे वास्तव्याला आहेत. कुष्ठरोग झाला म्हणून समाजाकडून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळणाऱ्यांची मुले या ठिकाणी शिकतात. १९८४ साली ही शाळा बांधण्यात आली, तर २०१३ मध्ये तिचे नूतनीकरण केले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची मुले या ठिकाणी शिक्षण घेतात. सद्य:स्थितीला पटसंख्या ४० असून २ शिक्षक आहेत. या शाळेलादेखील सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक दिलेले नाहीत. त्यामुळे येथील स्वच्छतेची जबाबदारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाच पार पाडावी लागते. विशेष बाब म्हणजे या ठिकाणीदेखील सोयीसुविधा पुरविण्यात शिक्षण मंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असताना सुप्रसिद्ध क्रि केटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शिक्षण घेतलेल्या मुंबईतील शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेने या शाळेला ६० बेंचेस आणि ६ संगणक उपलब्ध करून दिले आहेत. परंतु, शिकवायला तज्ज्ञ शिक्षक नसल्याने संगणक वापराविना अडगळीत पडले आहेत. याकडे शिक्षण मंडळ सदस्यांचेही पुरते दुर्लक्ष झाले आहे.