मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०१६पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी निश्चित केले असून, त्याकरिता दर महिन्याला या कामाच्या ठिकाणी अचानक भेट देण्याचा ‘गडकरी पॅटर्न’ अंमलात आणण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत पाटील यांच्या दालनात बैठक झाली. पनवेल ते इंदापूर या रस्त्याच्या कामाकरिता आवश्यक परवानगी दिल्लीतून तातडीने प्राप्त करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या ठिकाणी विविध पक्षी वास्तव्य करीत असल्याने या भागातील कामाला पर्यावरण विभागाची मंजुरी मिळत नाही. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही हा विषय गाजला होता. पाटील यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची दर महिन्याला पाहणी करण्याचे आपण निश्चित केले आहे. जेव्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेचे काम सुरू होते तेव्हा तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री अचानक कामाची पाहणी करण्याकरिता जात होते. मीही त्यांच्यासोबत जात होतो. काहीवेळा आम्ही दोघे कामाची पाहणी करून चहा पिऊन परतत होतो, असे पाटील म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)च्या बैठकीत पनवेल ते इंदापूर या रस्त्यासाठी जमीन संपादनाचे रखडलेले काम येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. कर्नाळा अभयारण्यामुळे या रस्त्याचे काम रखडले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा चौपदरीकरण वर्षभरात पूर्ण करणार
By admin | Updated: February 6, 2015 01:29 IST