Join us

संपूर्ण कर भरा; दंड विसरा

By admin | Updated: January 7, 2015 23:13 IST

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या मालमत्ताधारकांना कर न भरल्याप्रकरणी प्रशासनाच्या वतीने दंड आकारण्यात आला आहे.

ठाणे : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या मालमत्ताधारकांना कर न भरल्याप्रकरणी प्रशासनाच्या वतीने दंड आकारण्यात आला आहे. सदर थकबाकी मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम मालमत्ताधारकांनी ३१ जानेवारी २०१५ पर्यंत भरल्यास या रकमेवर आकारण्यात आलेला दंड १०० टक्के माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय महासभेने घेतला असल्याची घोषणा महापौर संजय मोरे यांनी केली.ठाणे महानगरपालिका हद्दीत असलेल्या काही मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर नियमित भरलेला नसल्याने प्रशासनाच्या महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार २ टक्के दंडाची रक्कम लावून वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे व्हावी, या दृष्टिकोनातून व दिलासा मिळावा, यासाठी जे मालमत्ताधारक चालू आर्थिक वर्षातील कराच्या रकमेसह मूळ रक्कम ३१ जानेवारी २०१५ पर्यंत महापालिकेकडे भरणा करतील, अशांना दंडाची १०० टक्के रक्कम माफ करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. तसेच जे मालमत्ताधारक त्यांचा मूळ मालमत्ता कर थकबाकीसह महापालिकेकडे २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत भरणा करतील, अशांना दंडाची ६० टक्के रक्कम तर ३१ मार्च २०१५ पर्यंत जे मालमत्ताधारक त्यांचा मूळ मालमत्ता कर थकबाकीसह भरणा करतील, अशांना दंडाची रक्कम ३३ टक्के माफ करण्यात येणार असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत २९ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयास महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनीही मान्यता दिली असून याबाबत कार्यवाही प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत प्रशासनाने प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चर्चा करून हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा व आपला मालमत्ता कर महापालिकेकडे त्वरित भरणा करावा, असे जाहीर आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)