नवी मुंबई : ऐरोली येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन नियोजित वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आमदार संदीप नाईक यांनी संबंधित ठेकेदार आणि महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या कामाला गती देण्यासाठी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नाईक यांनी महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासमवेत आज शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. ऐरोली सेक्टर - ४ येथे प्रगतिपथावर असलेल्या आंबेडकर भवनची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ऐरोलीतील प्रस्तावित नाट्यगृह, माता बाल रुग्णालय आणि घणसोली येथील सेंट्रल पार्कच्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. सावली गावातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आपण स्वत: आग्रही असून महापालिकेच्या माध्यमातून यासंबंधीचा निर्णय व्हावा, याकरिता लवकरच एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी यावेळी सांगितले. माजी महापौर सागर नाईक, माजी सभागृह नेते अनंत सुतार, शहर अभियंता मोहन डगांवकर, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. जनहिताच्या कामांना गती मिळावी यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबर सुसंवाद साधणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेणार असल्याचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)