Join us

मनपाविरोधात गुन्हा दाखल

By admin | Updated: June 12, 2014 02:30 IST

घनकचरा व्यवस्थापनात कुचराई करून प्रदूषण व संसर्गजन्य रोग पसरविण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून नेरूळ पोलिसांनी महापालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे

नवी मुंबई : घनकचरा व्यवस्थापनात कुचराई करून प्रदूषण व संसर्गजन्य रोग पसरविण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून नेरूळ पोलिसांनी महापालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस संतोष पाचलग यांनी केलेल्या तक्रारीरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून शहरातील दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावताना आवश्यक खबरदारी बाळगली जात नाही. अनेक भागात उघड्या ट्रकमधून कचऱ्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे संसर्गजन्य व साथीच्या रोगाचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संतोष पाचलग यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देवून कचरा उचलण्याचा कामात हलगर्जीपणा करणारे संबधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत छायाचित्रांसह माहिती देण्यात आली होती. मात्र यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी २२ जानेवारी २0१४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे छायाचित्रांच्या सबळ पुराव्यांसह तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली होती. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण मंडळाने ११ फेब्रुवारी २0१४ रोजी महापालिकेला नोटीस बजावून घनकचऱ्याची हाताळणी आणि वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानंतरही महापालिका आणि ठेकेदारांकडून कचरा वाहतुकीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले नाही. त्यामुळे पाचलग यांनी १0 एप्रिल २0१४ रोजी नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार करून महापालिका आणि ठेकेदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याआधारे नेरूळ पोलिसांनी यासंदर्भातील तक्रारीचा महापालिका व प्रदूषण मंडळाकडून अहवाल मागविला होता. याबाबतची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अखेर आज महापालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी व ठेकेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तक्रारदार संतोष पाचलग यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेवून कंत्राटदार नेमण्याची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी मागणी पाचलग यांनी केली आहे. (प्रतिनिधी)