मुंबई : अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मेहतर समाजाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून सफाई कामगारांचा रोष अद्याप शमलेला नाही. सलमान व शिल्पा यांच्याविरोधात भारतीय सफाई कामगार संघटनेने भोईवाडा न्यायालयात तक्रार केली आहे. त्यावर २७ फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी दिली.सोनवणे यांनी सांगितले की, या दोन्ही कलाकारांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मेहतर समाजाचा जातीय उल्लेख केलेला आहे. हीन उदाहरणासाठी समाजाचे नाव वापरून समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी ठिकठिकाणी पोलिसांना अर्ज देऊन अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. बहुतेक संघटनांनी रस्त्यावर उतरत या प्रकरणी निषेधही व्यक्त केला. मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने अखेर संघटनेने न्यायालयात धाव घेतली.संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भरत वाघेला यांनी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणीसाठी अर्ज दिला होता. तपास अधिकारी एम. एम. चव्हाण यांनी दोन्ही कलाकारांविरोधात राजस्थानात चुरू पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. अर्ज निकाली काढण्याचे पत्र दिले. त्याविरोधात भोईवाडा न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली आहे.
सलमान व शिल्पाविरोधात भोईवाडा कोर्टात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 04:29 IST