खलील गिरकर ।मुंबई : मॉर्निंग वॉक करताना पदपथावरील उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे अडखळून वरळी येथील रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या ७७ वर्षीय वृद्धेला १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने सोमवारी महापालिकेला दिले. आॅक्टोबर २०१७मध्ये झालेल्या या दुर्घटनेसाठी महापालिकेच्या ढिसाळ कारभाराला जबाबदार ठरवत आयोगाचे सदस्य एम.ए. सईद यांनी हे आदेश दिले आहेत. सहा आठवड्यांच्या आत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास महापालिकेला सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा ठपका आयोगाने महापालिकेवर ठेवला आहे.वरळी समुद्र किनाऱ्याजवळच्या पदपथावरील पेव्हर ब्लॉकची देखरेख महापालिकेने योग्य प्रकारे ठेवलेली नसल्याने अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडलेले होते. ९ आॅक्टोबर २०१७ रोजी ही वृद्ध महिला सकाळी पदपथावरून चालत असताना पेव्हर ब्लॉकला अडखळून खाली पडली. यात तिच्या चेहºयावर गंभीर जखमा झाल्या होत्या. या घटनेबाबत मानवी हक्क आयोगाने बातम्यांची स्वत:हून दखल घेत प्रकरण दाखल केले होते.अपघातग्रस्त वृद्ध महिलेला उपचारांसाठी ३ लाख रुपये खर्च आला होता. तसेच त्यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबाबत व त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी महापालिकेने पीडित महिलेला सहा आठवड्यांच्या आत १० लाख रूपये नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा त्यानंतर १२.५० टक्के व्याजासहित नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे आयोगाने आदेशात स्पष्ट केले आहे.पालिकेच्या कारभारावर ताशेरेमहापालिकेने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली आहे. महापालिकेने त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. सुनावणीदरम्यान महापालिकेने केलेला युक्तिवाद व बचावामध्ये त्रुटी असल्याचे मत आयोगाने व्यक्त केले आहे. नागरिकांकडून केल्या जाणाºया तक्रारींची महापालिका प्रशासनाने तत्परतेने दखल घेण्याची गरज आयोगातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
पेव्हरब्लॉकमुळे जखमी झालेल्या वृद्धेला भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 05:24 IST