Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबरच्या तुलनेत राज्यात दैनंदिन मृत्यूंत ५० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST

राज्यातील आकडेवारी : काेराेनाचे सक्रिय रुग्ण वाढलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ऑक्टाेबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये काेरोनाच्या रुग्णांची ...

राज्यातील आकडेवारी : काेराेनाचे सक्रिय रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात ऑक्टाेबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये काेरोनाच्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूंमध्ये ५० टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील पॉझिटिव्हीटी दरही एप्रिल महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये कमी झाला. मात्र दुसऱ्या बाजूला ८० हजारांवर आलेली सक्रिय रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

राज्यात ऑक्टाेबर महिन्यात २ लाख ९३ हजार ९६० रुग्ण आढळले, तर नोव्हेंबरमध्ये १ लाख ४५ हजार ४९० रुग्णांची नोंद झाली. ऑक्टाेबरच्या तुलनेत हे प्रमाण ५०.५ टक्क्यांनी कमी झाले आहे. ऑक्टाेबरमध्ये ७ हजार २४९ तर, नोव्हेंबर महिन्यात ३ हजार ६९० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृत्युदरही ४९.०९ टक्के घसरल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्यात पॉझिटिव्हीटी दर आठ टक्के, तर नोव्हेंबरमध्ये ताे ७.७ टक्के होता.

राज्याच्या कोरोना संसर्गाच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे, २० नोव्हेंबर रोजी ७८ हजार २७२ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. तर २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान यात प्रचंड वाढ होऊन ९० हजार ५५७ झाले आहे. सक्रिय रुग्णांमध्ये १५.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

* चाचणी, निदान, उपचारांवर भर

राज्याच्या आरोग्य विभागाने यापूर्वीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार, रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध, चाचणी, निदान आणि उपचार यावर शहर व ग्रामीण पातळीवर भर देण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

...........................