वाडा : नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी योगेश सासे या कामगाराने शिवनेरी भूमिपुत्र कामगार संघटनेच्या झेंड्याखाली कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सोमवार (दि. ११) पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाच्या दणक्याने कंपनी प्रशासनाने नमते घेऊन तीन लाखांची नुकसानभरपाई तसेच कायमस्वरूपी नोकरी देण्याचे मान्य केल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सोडण्यात आले. तालुक्यातील वडवली गावाच्या हद्दीत विप्रा क्लोजर ही कंपनी असून येथे काम करीत असताना अपघात होऊन योगेशच्या उजव्या हाताची दोन बोटे तुटली. त्यानंतर, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यावेळी कंपनीकडून नुकसानभरपाई देण्यात येईल, असे तोंडी सांगितले होते. मात्र, नुकसानभरपाई देण्यास कंपनी प्रशासन टाळाटाळ करीत होते. अखेर, नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी सोमवारपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. पहिल्या दिवशी कंपनी प्रशासनाने या उपोषणाची दखलही घेतली नाही. दुसऱ्या दिवशी सायंकाळी वाड्याचे तहसीलदार संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी उपोषणस्थळी येऊन कंपनीचे संचालक रघुवीर सिंग यांना योगेशच्या मागणीचा विचार करण्याचे सांगितले. या आंदोलनात अनेक संघटना उतरून आंदोलन चिघळेल, असे सांगितल्याने कंपनी प्रशासनाने नमते घेऊन तीन लाखांची नुकसानभरपाई व कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनास श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, तालुकाध्यक्ष मिलिंद धुले, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गोविंद पाटील यांनी पाठिंबा दर्शवून कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कामगार योगेश सावे यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)
आंदोलनाच्या दणक्याने कंपनी प्रशासन नमले
By admin | Updated: May 13, 2015 23:57 IST