Join us

मुंबई बॅँकेवर सर्वसामान्यांचा विश्वास

By admin | Updated: March 3, 2015 01:43 IST

सहा हजार कोटींची उलाढाल करणारी मुंबई बँक ही यशस्वी बँक आहे, असे गौरवोद्गार काढत बँकांवर संकटे येतात आणि टीकाही होते.

मुंबई : सहा हजार कोटींची उलाढाल करणारी मुंबई बँक ही यशस्वी बँक आहे, असे गौरवोद्गार काढत बँकांवर संकटे येतात आणि टीकाही होते. मात्र बँक चालविणाऱ्याचे मन स्वच्छ असल्यास बँक अपयशी ठरत नाही, असे उद्गार वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.मुंबई बँकेच्या मस्जीद बंदर येथील संगणकीकृत शाखेचे उद्घाटन सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते रविवारी झाले; या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, बँकेचे ज्येष्ठ संचालक बी. डी. पारले, वसंतराव सूर्यवंशी, संदीप घनदाट, पुरुषोत्तम दळवी, शिल्पा सरपोतदार, संजना घाडी, जिजाबा पवार, प्रकाश गंगाधरे, प्रकाश दरेकर, बँकेचे सरव्यवस्थापक डी. एस. कदम आणि नितीन बनकर उपस्थित होते.सुधीर मुनगंटीवर म्हणाले, की संगणकीकरण हे कर्मचारी वर्गाच्या सोयीसाठी, त्यांचे काम कमी व्हावे या उद्देशाने नाही, तर ग्राहकांना सेवा-सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून होत असते. राजकीय पक्षातील नेतेमंडळी बँकेच्या संचालक मंडळावर असूनदेखील पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकोप्याने बँकेच्या प्रगतीसाठी झटतात. ही सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय बाब आहे.शिवाजीराव नलावडे म्हणाले, की वसंतदादा पाटील यांनी जनहितासाठी स्थापन केलेल्या मुंबई बँकेला राजकारणाचा अड्डा होऊ देणार नाही. बँकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत अनेक नेते बँकेत आले, पण त्यांनी येथे कधीही राजकारण आणले नाही. नव्या सहकार कायद्यात ठेवीदारांच्या हिताच्या अनेक चांगल्या तरतुदी सरकारला करता येतील. सहकारी संस्थांचे कर्ज बुडविणाऱ्यांची मालमत्ता, बँक खाती थेट सील करून त्यांची विक्री करण्याची तरतूद सरकारने करावी. अशी कर्जं बुडविणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार पदाच्या निवडणुका लढविण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद १९५० च्या लोकप्रतिनिधी कायद्यात करावी. आणि तशी तरतूद केल्यास देशभरातील सहकारी संस्था आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या ठेवीदारांना न्याय मिळेल.प्रवीण दरेकर म्हणाले, की येत्या ३१ मार्चपर्यंत बँकेचे एनपीएचे प्रमाण शून्य टक्क्यांवर येईल. बँकेने सामाजिक बांधिलकी दाखविताना सुमारे अडीच हजार गिरणी कामगारांना म्हाडाच्या घरांसाठी तब्बल १६० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. शिवाय मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पुनर्बांधणीसह स्वयं पुनर्विकासाकरिता गृहनिर्माण संस्थेला ५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण योजना आहे. (प्रतिनिधी)