Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल खरेदीदार व पुरवठादार संमेलन यशस्वी; आंबा व भाजीपाला खरेदी-विक्रीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 02:18 IST

२० देशांतील शेतमालाचे आयातदार व भारतातील शेतमाल पुरवठा करणारे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार तसेच महाराष्ट्र, बिहार, केरळ, गुजरात इत्यादी राज्यांचे कृषी व फलोत्पादन विभागाचे शासकीय अधिकारी व फिक्कीचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबई : मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकतेच आंतरराष्ट्रीय शेतमाल खरेदीदार व पुरवठादार यांचे संमेलन यशस्वीरीत्या पार पडले. याप्रसंगी संमेलनात अपेडाचे सरव्यवस्थापक यू. के. वत्स, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणेचे कार्यकारी संचालक सुनील पवार, राज्यातील वरिष्ठ शासकीय यंत्रणा तसेच २० देशांतील शेतमालाचे आयातदार व भारतातील शेतमाल पुरवठा करणारे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, निर्यातदार तसेच महाराष्ट्र, बिहार, केरळ, गुजरात इत्यादी राज्यांचे कृषी व फलोत्पादन विभागाचे शासकीय अधिकारी व फिक्कीचे अधिकारी उपस्थित होते.

संमेलनात मुख्यत्वे आंबा व भाजीपाला खरेदी-विक्रीविषयक आयातदार व पुरवठादार यांच्यामध्ये समक्ष चर्चा घडविण्यात आल्या. पहिल्या सत्रात सुनील पवार यांनी महाराष्ट्र राज्याची कृषीविषयक बलस्थाने, निर्यातक्षम शेतमालाची वैशिष्ट्ये व कृषी पणन मंडळाने राज्यात विविध ठिकाणी उभारलेल्या सुविधा याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. यामध्ये बऱ्याच आयातदारांनी रस दाखविला असून, त्यांनी पुरवठादारांशी तातडीने संपर्क सुरू केला आहे.संमेलनाच्या दुपारच्या सत्रामध्ये, आयातदार व पुरवठादार यांच्यामध्ये समोरासमोर चर्चा होऊन शेतमाल निर्यातीबाबत पुढील दिशा ठरविण्यात आली. याशिवाय आंतरराष्ट्रीय आयातदारांनी नवी मुंबई, वाशी येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्र, हॉट वॉटर ट्रिटमेंटप्लान्ट व व्हेपर हीट ट्रिटमेंट इत्यादी निर्यात सुविधा केंद्रांना भेटी देऊन उभारण्यात आलेल्या सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. दरम्यान, दोन दिवसीय संमेलन देशातील व विशेषत: महाराष्ट्रातील शेतमाल निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरणार आहे.

टॅग्स :आंबा