Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याभरात समित्या, महामंडळांवरील नियुक्त्या

By admin | Updated: May 25, 2015 00:48 IST

मुख्यमंत्री : कार्यकर्त्यांनो, संदेशवाहक व्हा

कोल्हापूर : असंख्य कार्यकर्त्यांच्या अखंड मेहनतीमुळे भाजप सरकार सत्तेत आले आहे. आपल्या सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहे. ते लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनो, काम करा. कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. त्या दृष्टीने पक्षाची कार्यवाही सुरू असून महिन्याभरात विविध समित्या, महामंडळांवरील नियुक्त्यांची पूर्तता होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले.भाजपच्या तीनदिवसीय प्रदेश कार्यकारिणी व राज्य परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेसने सत्तेचे दलाल तयार केले. सत्तेचे लचके तोडण्याचे काम त्यांच्याकडून झाले. मात्र, भाजपची संस्कृती वेगळी आहे. आपण सत्तेचे सेवक आहोत. कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखण्यात येईल. त्यासाठी विविध समित्या, महामंडळांवरील नियुक्त्यांची पूर्तता एक महिन्यात केली जाईल. त्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षांचे नियोजन सुरू आहे. विविध ठिकाणी मिळणाऱ्या सत्तेचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करा. जी जबाबदारी देण्यात येईल ती प्रामाणिकपणे पार पाडा. (प्रतिनिधी)‘व्हॉट्स अ‍ॅप’चे जाळे तयार करासरकारचे निर्णय समाजातील तळागाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. व्हॉट्स अ‍ॅप आज ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे ‘व्हॉट्स अ‍ॅप’ ग्रुप तयार करा. सरकारचे निर्णय, योजना पोहोचवा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांना सांगितले. ते म्हणाले, सरकार आणि जनता यांच्यातील संदेशवाहक म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावे.