मुंबई : मुंबई मेट्रोचे प्रवासभाडे निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश पद्मनाभन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे येत्या काही दिवसांतच मेट्रो प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ही समिती न्यायालयाच्या आदेशानुसार प्रवाशांचे हित डोळ्यासमोर ठेवून मेट्रोचे भाडे निश्चित करणार आहे.मेट्रोचे भाडे १०, २०, ३० व ४० रुपये करण्यासाठी उच्च न्यायालयाने गुरुवारी हिरवा कंदील दिला. शिवाय गेल्या वर्षी आदेश देऊनही केंद्र सरकारने हे प्रवासभाडे निश्चित करण्यासाठी समिती नेमली नाही आणि हे दुर्दैवी असल्याचे खडेबोलही न्यायालयाने सुनावले. न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर रिलायन्स शुक्रवारीच मेट्रो भाड्यात वाढ केली आणि मुंबईकर प्रवाशांना त्याचा फटका बसू लागला. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांसह अन्य राजकीय पक्षांनीदेखील मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. येत्या ३१ जानेवारीपर्यंत सरकारने ही समिती स्थापन करावी. त्यानंतर तीन महिन्यांत समितीने मेट्रोचे भाडे निश्चित करावे. समितीने हे भाडे निश्चित करताना प्रवाशांच्या हिताचा विचार करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. यावर फडणवीस यांनी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नायडू यांनी मुंबई मेट्रोचे भाडे निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती पद्मनाभन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)