Join us

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध

By admin | Updated: March 4, 2015 01:15 IST

प्रवासात महिला प्रवाशांची होणारी छेडछाड आणि लगट थांबविण्यासाठी शेअर टॅक्सीत पुढची सीट महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला.

मुंबई : प्रवासात महिला प्रवाशांची होणारी छेडछाड आणि लगट थांबविण्यासाठी शेअर टॅक्सीत पुढची सीट महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला. मात्र या सेवेची अंमलबजावणी होते की नाही याकडे परिवहन विभागाने दुर्लक्षच केल्याचे समोर आले. शेअर टॅक्सीत महिला प्रवाशांसाठी सीट राखीव ठेवली जाते का याचे ‘लोकमत’कडून रिअ‍ॅलिटी चेक केल्यानंतर ही बाब समोर आली. यासंदर्भात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभाग महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून राखीव सीट ठेवण्यासाठीची अंमलबजावणी होत आहे, त्याबाबत फलक लावण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी परिवहन विभागाला सूचना करण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शेअर टॅक्सीतून प्रवास करताना प्रवासात कधी कधी पुरुषाकडून महिला प्रवास्यांशी लगट करण्याचा प्रयत्नही होतो.त्याबाबतच्या तक्रारी आल्याने महिला प्रवाशांसाठी पुढची सीट राखीव ठेवण्याचा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला. ३१ जानेवारी रोजी यासंदर्भात परिवहन विभागाकडून आदेश काढल्यानंतर त्या आदेशाच्या अंमलबजावणीस २ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली. शेअर टॅक्सींच्या मार्गावर महिलांसाठी एक फलक लावण्याचे आदेश देतानाच टॅक्सीतून महिला प्रवासी प्रवास करत नसतील तर महिलांच्या राखीव आसनावर पुरुष प्रवासी प्रवास करू शकतील, असेही फलकावर नमूद करण्यास परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. तसेच टॅक्सी चालकाने आणि पुरुष प्रवाशांनीही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. परंतु परिवहन विभागाच्या या नव्या सुविधेचे ‘लोकमत’कडून रिअ‍ॅलिटी चेक केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होतच नसल्याचे समोर आले. पैसे कमविण्याच्या नादात तर शेअर टॅक्सी चालकाकडून पुढील सीटवर दोन प्रवासी बसविले जातात आणि महिला प्रवाशांना प्राधान्य दिले जात नाही. (प्रतिनिधी)च्शेअर टॅक्सी चालकाकडून नियमांची अंमलबजावणी नाही.च्जादा प्रवासी मिळवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी चालकाकडून महिलांना पुढील सीट उपलब्ध करून दिली जात नाही.च्अनेक मार्गांवर शेअर टॅक्सीत महिला प्रवाशांना पुढील सीट राखीव असल्याचे फलकही नाहीत.च्पुरुष प्रवाशांकडूनही महिला प्रवाशांना पुढील सीटवर बसण्यास प्राधान्य दिले जात नाही.