मुंबई : महापालिकांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीऐवजी वॉर्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला खरा; पण तो अद्याप मंत्रालयातून समोरच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे वॉर्ड पद्धतीच्या आधारे निवडणूक घेण्याची कोणतीही कार्यवाही आयोगाने अद्याप सुरु केलेली नाही. प्रभागाऐवजी वॉर्ड रचनेनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय १८ डिसेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी आज स्पष्ट केले की, निवडणूक प्रकिया सुधारणेसंबंधीचा निर्णय शासनाने आम्हाला अद्याप कळविलेला नाही. औरंगाबाद, नवी मुंबई महापालिकेसह काही नगरपालिकांची निवडणूक येत्या एप्रिलमध्ये होणार आहे. त्यासाठी वॉर्डरचना, आरक्षण सोडत आदी कार्यवाही करायची तर आम्हाला किमान तीन-साडेतीन महिने आधीपासून तयारी करावी लागते. निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार हे शासनाने आम्हाला येत्या आठ दिवसांत कळविले नाही, तर आम्हाला पूर्वीच्या प्रभाग पद्धतीनेच निवडणूक घ्यावी लागेल, असे निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.शासन आणि आयोगामध्ये विसंवाद होऊ नये यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया हे येत्या दोन दिवसांत राज्य शासनाला पत्र लिहून शासनाला नेमके कोणत्या रचनेनुसार निवडणूक हवी आहे याची विचारणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)निवडणुकीचे उमेदवारी अर्ज आॅनलाइन भरण्याची पद्धत आयोगाने अलिकडे काही ग्राम पंचायतींच्या निवडणुकीपासून सुरू केली आहे. हीच पद्धत आगामी पालिका निवडणुकांत राबविण्याचा आयोगाचा विचार आहे.
प्रभागाचे वॉर्ड झाल्याची आयोगाला माहितीच नाही
By admin | Updated: December 30, 2014 01:40 IST