Join us  

लवकरच पोहोचतोय, जेवण तयार ठेव; खूप भूक लागलीय! मृत्यूच्या ३० मिनिटांपूर्वी ‘व्हिडीओ कॉल’

By गौरी टेंबकर | Published: December 26, 2023 6:16 AM

पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने समीर जाधव यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या ३० मिनिटांपूर्वी पत्नीला व्हिडीओ कॉल केला होता.

गौरी टेंबकर-कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): रविवारी वाकोला येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने  समीर जाधव (३७) यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या ३० मिनिटांपूर्वी पत्नीला व्हिडीओ कॉल केला होता. खूप भूक लागलीय, पोहोचतोय... जेवण बनव, हे संभाषण शेवटचे ठरले. प्रत्यक्षात घरी पोहोचण्यापूर्वी त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतंग उडवणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू आहे.

जाधव यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीतील वरळी बीडीडी चाळ येथे ७७ क्रमांकाच्या इमारतीत कॉन्स्टेबल जाधव त्याची पत्नी आणि तीन मुले स्वरा (८) आणि २ वर्षीय जुळी मुले स्पृहा आणि अर्णव यांच्यासोबत राहत होते. जाधव हे दत्त जयंतीसाठी रत्नागिरीतील मंडणगड येथील गावी जाणार होते. त्यासाठी त्यांनी सोमवारची रेल्वे तिकीटही काढले. त्यांनी गावी राहणाऱ्या आई-वडिलांकडे अर्णव याला आधीच पाठवले होते. रविवारी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास जाधव यांनी पत्नीला व्हिडीओ कॉल केला होता. यासंदर्भात सांगताना कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. जाधव पोलिस दलासह परिसरातही प्रिय होते. अशा उमद्या मनाच्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूने सारेच हळहळले. 

सहकारी, वरिष्ठांना अश्रू अनावर  

गावी जाण्यासाठी बिस्किटाचे पुडे, दत्त जयंतीसाठी पूजेचे साहित्य, पत्नीसाठी खरेदी केलेली साडीही व्हिडीओ कॉलवर दाखवली. दिंडोशी पोलिस स्टेशनपासून ते त्यांच्या दुचाकीवर पार्किंगमध्ये पोहोचेपर्यंत ते व्हिडीओ कॉलवर पत्नीसोबत बोलले, तसेच जाधव यांनी जेवण बनवण्यासाठी सांगितले, या अखेरच्या संवादामुळे जाधव कुटुंबीयांसह पोलिस खात्यातील अनेक सहकारी, वरिष्ठांना अश्रू अनावर झाले.  या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध  नोंदविण्यात आला आहे. जाधव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मांजा चायनीज मांजा आहे की नाही, हे तपासण्यासाठी आम्ही मांजा फॉरेन्सिक विभागाकडे पाठवला असून पतंग उडवणाऱ्याचाही शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गावी बांधायचे होते घर

कोविडच्या काळात जाधव यांनी रहिवाशांना मदत केली आणि नोकरी गमावलेल्या अनेक लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली. जाधव यांचे आई-वडील गावी राहत होते. त्यांच्यासाठी गावात घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, हे स्वप्न अधुरेच राहिले. 

 

टॅग्स :मुंबई पोलीस