Join us  

येत्या निवडणुकांसाठी शिवसेनेची उत्तर भारतीयांना साद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 6:57 PM

शिवसेनेच्या वरळी येथील राष्ट्रीय अधिवेषनात आगमी निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.

मनोहर कुंभेजकर

एकीकडे भाजपाने आज बिकेसी येथील संमेलनात लाखोंच्या संख्येने शक्ति प्रदर्शन केले असतांनाच,आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी शिवसेनेने देखिल आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे.कांदिवलीत येत्या रविवारी उत्तर भारतीय सन्मान संमेलनाचे आयोजन मागाठाणे विधानसभेचे आंमदार प्रकाश सुर्वे यांनी केले आहे."उत्तर भारतीय के सन्मान मे आमदार प्रकाश सुर्वे मैदानमे " असे चित्र मागाठाणे विधानसभेत असून या संमेलनाची जोरदार तयारी त्यांनी केली आहे.आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने उत्तर भारतीय नागरिकांना साद घातल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेच्या वरळी येथील राष्ट्रीय अधिवेषनात आगमी निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.

मुंबईत आता फक्त 22 टक्के मराठी मतदार आहेत.त्यामुळे फक्त 22 टक्के मराठी मतदारांवर निवडणुका जिंकणे म्हणजे तर तारेवरची कसरत आहे.त्यामुळे शिवसेना आतापासूनच सर्व जाती धर्माच्या नागरिकांशी थेट संपर्क ठेवण्यास सुरवात केली आहे.मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदार संघावर आणि 6 लोकसभा मतदार संघांवर शिवसेनेने आपले लक्ष केंद्रित केले आहे.आता मराठी मतदारांबरोबरच आता शिवसेनेने उत्तर भारतीय नागरिकांबरोबर संपर्क ठेऊन त्यांच्या सन्मान संमेलनाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेचे मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीय सम्मान संमेलनाचे येत्या रविवार दि,8 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता कांदिवली (पूर्व)येथील भूमी व्हॅली समोरील खेळाचे मैदान,ठाकूर स्टेडियम समोर,ठाकूर व्हिलेज येथे केले आहे.यावेळी मुंबईच्या विकासात आणि कला, क्रीडा,शिक्षा,सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उत्तर भारतीय प्रतिष्टीत नागरिकांचा यावेळी खास सत्कार करण्यात येणार आहे.राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई,पर्यावरण मंत्री रामदास कदम व सार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत.या संमेलनाचे खास आकर्षण म्हणजे भोजपुरी रंगा रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भोजपुरी चित्रपटातील सुपरस्टार खेसारीलाल यादव व प्रसिद्ध अभिनेत्री रितू सिह यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

याप्ररकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले की,मागाठाणे विधानसभेत उत्तर भारतीय नागरिकांचे शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते आहे.आत्ताच परीक्षा संपल्या आहेत.त्यामुळे त्यांच्या मनोरंजनासाठी आणि उत्तर भारतीय समाजातील मान्यवर नागरिकांचा सत्कार करण्यासाठी या सन्मान संमेलनाचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.ही जरी निवडणुकीची तयारी नाही असे जरी आमदार सुर्वे म्हणत असले तरी, "उत्तर भारतीय के सन्मान मे आमदार प्रकाश सुर्वे मैदान मे" अशी जोरदार चर्चा मात्र येथील मतदार संघात रंगली आहे.

टॅग्स :शिवसेनानिवडणूक