Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र या; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे शरद पवारांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:04 IST

मुंबई : काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीन गेलेल्या जमीनदारासारखी झाल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. पवार ...

मुंबई : काँग्रेसची अवस्था एखाद्या जमीन गेलेल्या जमीनदारासारखी झाल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. पवार यांच्या या विधानाशी असहमती दर्शवितानाच टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी केले.

शरद पवारांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पवार यांच्या विधानाशी मी असहमत आहे. त्यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचे काही नुकसान होणार नाही; पण जे राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी बांधील आहेत त्यांनी टीका करण्यापेक्षा बरोबर यायला हवे. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही, तसेच राज्यघटना टिकविण्यासाठी एकत्र लढाई करावी, अशी अपेक्षा असल्याचेही थोरात म्हणाले. काँग्रेस हा एक विचार आहे. धार्मिक भेदाभेद करणारे वाढल्याने काँग्रेसच्या विचारसरणीला कठीण दिवस आले आहेत. आपण एका विचाराचे आहोत, आपण सर्व एकत्र आलो तर काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी थोरात यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचाही समाचार घेतला. आमच्या ध्यानीमनी नसताना आम्हाला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरचौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असे सत्तेतील एका वरिष्ठ मंत्र्याने मला सांगितल्याचा दावा पाटील यांनी केला होता. त्यावर चंद्रकांत पाटील हे हल्ली फारच गंमतीदार विधाने करीत आहेत, असा टोला थोरातांनी लगावला.