Join us  

चलो, एक कटिंग चाय हो जाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 6:23 AM

मुंबईत पहिल्यांदाच चहा महोत्सव; चॉकलेट व भटाचा चहा मुख्य आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादर सांस्कृतिक मंचातर्फे जागतिक चहा दिनानिमित्त मुंबईत पहिल्यांदाच ‘चहा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. दादर पश्चिमेकडील शिवाजी पार्कमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या आवारात रविवारी चहा महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी चॉकलेट व भटाचा चहा हा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती दादर सांस्कृतिक मंचाने दिली.

महोत्सवात सात ते आठ वेगवेगळ्या प्रकारचे चहा होते. यात साधा चहा, मसाला चहा (साखरेचा आणि बिनसाखरेचा), चॉकलेट चहा, भटाचा चहा, ग्रीन टी, लेमन टी, केसरीया चहा, कॉफी इत्यादी चहाचे प्रकार चहाप्रेमींसाठी उपलब्ध होते. याशिवाय चहासोबत काहीतरी खाण्यासाठी काही खाद्य पदार्थांसह उपवासाचे पदार्थ ठेवण्यात आले होते. यात साबुदाणा वडा, खिचडी, बटाटावडा, भजी, भेळ, शेवपुरी आणि चायनिज भेळ आदींचा समावेश होता.

दादर सांस्कृतिक मंचाच्या अध्यक्षा उत्तरा मोने म्हणाल्या की,चहा महोत्सवाला तीन हजार नागरिकांनी भेट दिली. आपल्याला चहाचे वेगवेगळे प्रकार दिसतात, त्यातील मोजकेच सात ते आठ प्रकार ठेवण्यात आले. ज्या वेळी चहा महोत्सवाची तारीख निश्चित केली तेव्हा त्याच दिवशी संकष्टी चतुर्थी देखील असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मुंबईकरांची पंचाईत व्हायला नको.यासाठी उपवासाच्या खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. चहा महोत्सवात चहावर केलेल्या काही चारोळ्या व कवितांचे बॅनर लावण्यात आले आहेत.वेगळाच आनंद अनुभवलाशिवाजी पार्क ही वास्तू म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगत असल्यामुळे येथे चहा पिण्याचा वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला. चांगल्या प्रतीचा चहा व गरमागरम खाद्यपदार्थ मित्र-मैत्रिणींसोबत खाण्यासाठी मिळाले. याशिवाय ज्यांचा उपवास होता, त्यांचीही व्यवस्था उत्तमरीत्या करण्यात आली, अशा प्रतिक्रिया चहाप्रेमींनी दिल्या.