Join us  

पुढच्या वर्षी लवकर या! कोरोनाचे संकट दूर व्हावे, हीच गणरायाचरणी भाविकांची प्रार्थना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 6:22 AM

पुढच्या वर्षी १०दिवस लवकर आगमन..., मास्क वापरा... सुरक्षित अंतर ठेवा; ‘लोकमत’चे गणेशभक्तांना आवाहन...

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असल्याच्या धास्तीपोटी यंदाच्या गणेशोत्सवावरही निर्बंधांची मालिका कायम होती. पण तरीही मर्यादित मुखदर्शन, थेट प्रक्षेपण करून ऑनलाईन दर्शन, मिरवणुकींना फाटा देत सावर्जनिक मंडळांनी दक्षता घेतल्याने दिलासादायक वातावरणात साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढील वर्षी लवकर या...’च्या जयघोषात बाप्पाला निरोप देताना, कंठ दाटून आलेला असतानाच कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, हीच प्रार्थना मनोमन करून अवघे गणेशभक्त आज बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहेत. (Come early next year! The crisis of Corona should be removed, this is the prayer of Ganapati bappa's devotees)

दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरू झाले असले, तरी सगळी गाडी अजूनही रुळावर आलेली नाही. त्यातच संसर्गाचा मोठा धोका असल्याने सण-उत्सवांच्या काळात कमालीची जागरुकता ठेवावी, म्हणून राज्याचा टास्क फोर्स आग्रही आहे. उत्सवातील जल्लोषाचा भाग कमी झाल्याने काहींचा हिरमोड झाला असला, तरी कोरोना रुग्णांची तूर्तास आटोक्यात असलेली संख्या हा सगळ्यात मोठा दिलासा आहे. आज विसर्जनही तशाच शिस्तीने केले जाईल, याकडे गणेशोत्सव समन्वय समिती, स्थानिक प्रशासन यांचे लक्ष आहे. विसर्जनावेळी अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आली आहे.

मास्क वापरा... सुरक्षित अंतर ठेवा; ‘लोकमत’चे गणेशभक्तांना आवाहनआपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना भक्तांनी कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. विसर्जनावेळी मास्क अवश्य वापरा, गर्दी टाळा, सुरक्षित अंतर पाळा आणि हात स्वच्छ धुवा, असे आवाहन अनंतचतुर्दशीच्या निमित्ताने ‘लोकमत’ राज्यभरातील गणेशभक्तांना करत आहे. आपण सर्वांनी मिळून दुसरी लाट अशीच नियंत्रणात ठेवायची आणि तिसऱ्या लाटेला थोपवायचे आहे, हे गणेशाला साक्षी ठेवून स्मरणात राहू द्या. विसर्जन करताना पर्यावरणाचे भान ठेवा आणि स्वतःचा जीव धोक्यात येईल असे वर्तन करू नका, अशी ‘लोकमत’ची कळकळीची विनंती आहे.

पुढच्या वर्षी १०दिवस लवकर आगमनगणरायाला निरोप देताना आपण म्हणतो 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.', भक्तांची ही मागणी गणरायाने मान्य केली असून पुढच्या वर्षी बाप्पा १० दिवस लवकर म्हणजे बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. सन २०२३ मध्ये मात्र श्रावण महिना अधिक येणार असल्याने बाप्पा उशिरा म्हणजे मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ ला येणार आहेत.

पोलिसांचा अतिदक्षतेचा इशाराराज्यात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व विसर्जन स्थळे, महत्त्वाची गर्दीची ठिकाणे आणि रेल्वे स्थानक परिसरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा देत विशेष खबरदारी घेतली जात आहे. 

टॅग्स :गणेश विसर्जनगणेशोत्सवमुंबईकोरोना वायरस बातम्या