पनवेल : स्वातंत्र्य दिन आणि पंतप्रधानांचा जेएनपीटी दौरा या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीसांनी गुरूवारी कोम्बिंग आॅपरेशन केले. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणीही विशेष मोहीम राबवली.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही घातपात होऊ नये, याकरीता शहरात विशेष मोहीम हाती घेण्यात येते. याशिवाय शनिवार, १६ आॅगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उरण येथील जेएनपीटीत आयोजित साडेबारा टक्के भूखंडाचे वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. त्याचबरोबर एसईझेड आणि जेएनपीटी रोडच्या चौपदरीकरणाचे भूमीपूजन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, अनंत गिते आणि पियुश गोयल उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान पहिल्यांदाच नवी मुंबईत येत असल्याने पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या सुरक्षिततेवर पोलीस महासंचालकांचे लक्ष असून इतर राज्यातील महासंचालकांनीही सुरक्षिततेचा आढावा घेतला. त्याचबरोबर नवी मुंबई, उरण आणि पनवेलमध्ये विशेष खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पनवेल शहरातील सर्व लॉज आणि हॉटेल्समध्ये कोम्बिंग करून पोलीसांनी झाडाझडती सुरू केली आहे. त्याचबरोबर संशयीत ठिकाणी पोलिसांनी विशेष वॉच ठेवला असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
पनवेलमध्ये कोम्बिंग आॅपरेशन
By admin | Updated: August 16, 2014 00:55 IST