Join us

रंगीबेरंगी पणत्यांनी बाजार फुलला

By admin | Updated: October 17, 2014 22:44 IST

रंगीबेरंगी दिव्यांनी नटलेला सण म्हणजे दिवाळी. हाच सण साजरा करण्यासाठी रंगीबेरंगी, विविध आकारातील पणत्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.

पूनम गुरव - नवी मुंबई
रंगीबेरंगी दिव्यांनी नटलेला सण म्हणजे दिवाळी. हाच सण साजरा करण्यासाठी रंगीबेरंगी, विविध आकारातील पणत्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. दिवाळीमध्ये  घर, अंगण आणि आजूबाजूचा परिसर प्रकाशमय करण्यासाठी नवी मुंबईतील सर्व  बाजारपेठेत पणती खरेदीसाठी महिलावर्गाची झुंबड उडाली आहे.
दिवाळीमध्ये पणत्यांना अन्यन्य साधारण महत्त्व आहे.  पारंपरिक  पध्दतीने म्हणजेच पणती लावून आज ही तितक्याच उत्साहाने शहरी भागात दिवाळी साजरी केली जाते. अवघ्या पाच  दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाची अंतिम खरेदी  सुरू आहे. ग्राहक ही आपल्या बजेटनुसार व आवडीनुसार  खरेदी करताना दिसत आहेत. नवी मुंबई घाऊक आणि किरकोळ बाजारपेठेत रंगीबेरंगी  विविध  व्हेरायटीमधील पणत्या दाखल झाल्या असून ग्राहकवर्गाची याला अधिक पसंती मिळत आहे. 
लाल मातीपासून तयार केलेल्या साध्या पणत्यांपासून फुलाकृती आणि रेडिमेड पणत्या आहेत. यावर्षी तयार पणत्यांमध्ये अधिक व्हेरायटी बाजारात दाखल असल्यामुळे नवनवीन प्रकारातील पणत्यांना आणि मागणी आहे. त्याचबरोबर हत्ती, घोडा आदी प्राण्यांच्या आकारातील पणत्याही बाजारात उपलब्ध आहेत.   बाजारपेठेत लेस,आरसा व काच यांचा वापर करून डेकोरेट केलेल्या पणत्या, चिनी मातीपासून तयार केलेल्या पणत्या बाजारात आहेत. 
 
काचेच्या बॉलमध्ये,ग्लासमध्ये वन टाईम युज अशा स्वरूपातील पणत्याही उपलब्ध आहेत. तसेच  सरस्वती, देवीच्या मूर्तीच्या हातामध्ये पणती घेतलेल्या पारंपरिक पणत्याही ग्राहकांना आकर्षित करत आहेत. तसेच अनेक ग्राहक साध्या किंवा चिनी मातीच्या पणत्या खरेदी करून त्यावर विविध रंगाचे नक्षीकाम केले जात आहे.