Join us
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वाहनांवरील ‘कलर कोड’ आठवड्याच्या आतच रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:05 IST

लाेक ऐकेनात ; गैरवापर वाढल्याने प्रत्येक गाडीची होणार तपासणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या ...

लाेक ऐकेनात ; गैरवापर वाढल्याने प्रत्येक गाडीची होणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या खासगी वाहनांवरील नियंत्रणासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर कलर काेड म्हणजेच रंगीत स्टिकर लावण्याचा घेतलेला निर्णय मुंबई पोलिसांना अवघ्या सहा दिवसात गुंडाळावा लागला. नागरिकांकडून त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊन तपासणीमध्ये गोंधळ वाढल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री मुख्य वाहतूक नियंत्रण कक्षातून त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना देण्यात आल्या. आता सरसकट सर्व वाहनांची तपासणी केली जाईल.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी खासगी वाहनांचा वापर करण्यास परवानगी आहे. त्यामध्ये सुसूत्रता यावी, तपासणीमुळे हाेणारी वाहनांची गर्दी व खाेळंबा टाळता यावा, यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईत आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या खासगी वाहनांवर लाल रंगाचा, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या खासगी वाहनांवर हिरवा आणि सरकारी अधिकारी, तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर पिवळ्या रंगाचा स्टिकर लावण्याची सूचना केली होती. गेल्या रविवारपासून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

मात्र सामान्य नागरिकही आपल्या वाहनांवर हे स्टिकर लावत होते. गैरवापर वाढल्याने अनेक ठिकाणी तपासणी वेळी पोलिसांबरोबर वाद होऊ लागले हाेते. त्यामुळे कलर कोड वापराचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस उपायुक्त (अभियान) एस. चैतन्या यांनी शुक्रवारी याबाबत नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर आता सरसकट सर्व वाहनांची तपाणी हाेईल.

.............................