Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून मुंबईतील महाविद्यालये सुरु होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:07 IST

मुंबई विद्यापीठाचाही दुजोरालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहेत. मात्र, मुंबई आणि ...

मुंबई विद्यापीठाचाही दुजोरा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहेत. मात्र, मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये उद्या सुरू होणार नाहीत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन २२ फेब्रुवारीपर्यंत विचार होणार आहे. एकीकडे राज्यभरातील विद्यापीठे, त्याअंतर्गत येणारी महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला. तरीसुद्धा मुंबईतील महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली आहे.

मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून २२ फेब्रुवारीपर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊन महाविद्यालयांबाबत सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरु करता येतील, यावर निर्णय घेऊ, असे सांगितल्याने मुंबई विद्यापीठ प्रशासनाने मुंबई महापालिका क्षेत्रातील महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वसई-विरार, पनवेल, पालघर या क्षेत्रात महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर या भागातील महाविद्यालये राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन करत सुरू होणार आहेत. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालये सुरू करण्याबाबत कळविले नसल्याची माहिती आहे.

बुक्टो प्राध्यापक संघटनेचाही विरोध

राज्य शासनाच्या ३ फेब्रुवारी रोजीच्या महाविद्यालये सुरु करण्याबाबतच्या निर्णयात प्रत्येक विद्यापीठाने स्थानिक प्राधिकरणाची सहमती घेऊन महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. मात्र, असे असतानाही मुंबई विद्यापीठाने महाविद्यालय सुरू करण्याबाबत काढलेल्या परिपत्रकात ही जबाबदारी त्या-त्या भागातील महाविद्यालये शैक्षणिक संस्थांवर सोपवली आहे. याबाबत ‘बुक्टो’ने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून यामध्ये तातडीने लक्ष घालण्यास सांगितले होते.