Join us  

मुंबईतल्या खवय्यांसाठी या खाऊ गल्ल्या आहेत फेव्हरेट प्लेस 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 8:36 PM

मुंबईत अनेक ठीकाणी म्हणजेच कॉलेज आणि शॉपिंग स्ट्रीटच्या आसपास असलेल्या या खाऊ गल्ली मुंबईकरांच्या आवडत्या आहेत.

ठळक मुद्देआपण जगण्यासाठी खातो तर काही खाण्यासाठी जगतात. त्यांच्यासाठी हा खास लेख. मुंबईतील काही मुख्य ठीकाणी असलेल्या या खाऊ गल्ली तरुणांमध्येही लोकप्रिय आहेत.

मुंबई - गेल्या अनेक वर्षापासून मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही अनेक लोक या स्वप्ननगरीमध्ये आलेत. त्यामुळे मुंबईत अनेक राज्यातील लोकांची सरमिसळ झालेली पाहायला मिळते. कदाचित म्हणूनच मुंबईत अनेक प्रकारचे खाद्य पदार्थही मिळतात. मुंबईतील प्रत्येक विभागात एकतरी खाऊ गल्ली आहेच. या खाऊ गल्लीत तुम्हाला एखाद्या रेस्टॉरंटमध्येही मिळणार नाहीत एवढे पदार्थ खायाला मिळतात. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते हायक्लास लोकांपर्यंत सगळेच अशा खाऊ गल्लीला भेट देत असतात. बरं, या खाऊगल्ली शॉपिंग स्ट्रीट, शॉपिंग मॉलच्या आजूबाजूलाच असल्याने अनेक शॉपिंग लवर अशा खाऊगल्लींना हमखास भेट देतात. अशाच खाऊगल्लीविषयी आज आपण पाहुया.

एसएनडीटी ते क्रास मैदान खाऊ गल्ली

 या खाऊगल्लीविषयी कॉलेजच्या तरुणांना माहित नसणं शक्यच नाही. सीएसटीच्या फॅशन स्ट्रीटच्या मागच्या गल्लीत असलेली ही खाऊगल्ली मुंबईकरांमध्ये फारच प्रसिद्ध आहे.  या खाऊ गल्लीच्या बाजूला एसएनडीटी कॉलेज आणि अनेक ऑफिस असल्याने इकडे नेहमीच गर्दी असते. सीएसटीतील एल्फिन्स्टन कॉलेज, सिद्धार्थ कॉलेजमधीलही विद्यार्थी या खाऊ गल्लीत येत असतात.  खाऊगल्लीत खाणावळही असल्याने अनेक ऑफीस कर्मचाऱ्यांना अगदी कमी किंमतीत घरचं जेवण मिळतं. फ्रॅन्कीचे विविध प्रकार, पावभाजी, मन्चुरिअन राईस, सॅण्डवीच असं सारं काही तुम्हाला इकडे चाखायला मिळेल. 

कार्टर रोड खाऊगल्ली

वांद्रे इथे असणारी कार्टर रोड खाऊगल्लीही कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे. तुम्ही जर रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थांच्या प्रेमात असाल तर कार्टर रोडवर एकदा नक्की फेरफटका मारून या. चमचमीत पदार्थांसोबतच गरम मसालेदार नॉनव्हेज पदार्थांपर्यंत सारंकाही इकडे चाखायला मिळेल. इकडे मिळणारी लस्सीही फार प्रसिद्ध  आहे. कार्टर रोडच्या खाऊ गल्लीत तरुण मंडळी अधिक येत असल्याने इकडे तुम्हाला मोमो, बर्गर, फ्रॅन्की असे परदेशी पदार्थही चाखायला मिळतील. पण त्याहीपेक्षा इकडे मिळणारा शोरमा सगळ्यात बेस्ट आहे. शोरमा खाण्यासाठी तरी तुम्ही कार्टर रोडला एकदा नक्की भेट द्या. 

घाटकोपर खाऊ गल्ली

जर तुम्ही शुद्धा शाकाहारी असाल तर घाटकोपर स्थानकाच्या बाहेर असलेल्या खाऊ गल्लीला एकदा भेट द्याच. तुम्ही कधी रिमिक्स डोसा खाल्लाय? नावही जरा विचित्र वाटतंय ना. पण या खाऊ गल्लीतील हा सगळ्यात प्रसिद्ध डोसा आहे. एवढंच नाहीतर इकडे वेगवेगळ्या प्रकारचेही डोसे तुम्हाला चाखायला मिळू शकतील. तुम्ही जर आईस्क्रीम लव्हर असाल तर इकडचा आईस्क्रीम डोसाही एकदा खाऊन बघाच. चीझ बर्स्ट डोसा, आयलँड डोसाही इकडे फार प्रसिद्ध आहे. डोश्यांव्यतिरिक्तही इथे अनेक पदार्थ मिळतात. मात्र डोसा जरा जास्त प्रसिद्ध आहे. 

मोहम्मद अली रोड खाऊ गल्ली

रमजानच्या काळात खवय्ये मंडळी या खाऊ गल्लीला हमखास भेट देतातच. तगडी कबाब, चिकन हकीमी, टीक्का असे चटपटीत नॉन व्हेजचा आनंद घ्यायचा असेल तर मोहम्मद अली रोडसारखी दुसरी खाऊ गल्ली नाही मुंबईत. रमजानच्या काळात तर दुरवरून माणसं इकडे खास या पदार्थांचा आस्वाद घ्यायला येत असतात. तंदुरी इकडची सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ. तंदुरीचे अनेक प्रकार इकडे चाखायला मिळतात. फक्त सामान्य माणसंच इकडे भेट देतात असंही नाही. अनेक बॉलिवूड कलाकार इकडे आवर्जून भेट देत असतात. इकडचं बडेमिया, नूर मोहम्मद हॉटेल ही दोन्ही हॉटेलं संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे ही  खाऊ गल्ली ज्याप्रमाणे नॉनव्हेज पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे मिठाईंच्या दुकानामुळेही प्रसिद्ध आहे. जगातले सगळ्या मिठाई तुम्हाला इकडे हमखास मिळतील. त्यासाठी सुलेमान उस्मान मिठाईवाला हे दुकान फार प्रसिद्ध आहे. 

खारघर खाऊ गल्ली

खारघरच्या उत्सव चौकाच्या बाजूला असलेली ही खाऊ गल्ली तिकडे असलेल्या स्वच्छतेमुळे फार प्रसिद्ध आहे. शुद्ध हवा, स्वच्छ परिसर आणि रस्त्याच्या मध्यभागी असलेलं कारंजा या खाऊ गल्लीची शोभाच वाढवतं. संध्याकाळी इकडे तुफान गर्दी असते. मुळात हा परिसर इतका सुंदर आहे की लोक हमखास आपली संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी इकडे येत असतात. जर तुम्हाला मोमो आवडत असतील तर एखाद्या संध्याकाळी खारघर खाऊगल्लीत एकदा नक्की भेट द्या. इकडचे मोमो लाजवाब आहेत. व्हेज-नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात तुम्हाला मोमोजचा आस्वाद घेता येईल. त्यासाठी तिकडचा दार्जिंलिंग सिक्किम मोमोज हा स्टॉल प्रसिद्ध आहे. तसंच, खारघर फ्राय कॉर्नर, लिटल चिना फास्ट फूड या स्टॉल्सवरही चमचमीत खायाला मिळेल. 

ताडदेव खाऊ गल्ली

आपल्या घरापासून लांब राहणाऱ्या चाकरमन्यांमध्ये ही खाऊ गल्ली फार प्रसिद्ध आहे. अगदी घरच्या जेवणाची चव इकडच्या स्टॉल्सवर असते. चमचमीत पदार्थ इथे चाखायला तर मिळतीलच पण रोजच्या  जेवणातील वरणभात, पुरीभाजीही तुम्हाला इकडे मिळेल. साहजिकच आजूबाजूला असलेल्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांसाठी ही खाऊगल्ली आहे. कारण दुपारच्या वेळेत हे कर्मचारी इकडेच दुपारचं जेवण करायला येतात. 

झवेरी बाझार खाऊ गल्ली

सोनं, चांदी, हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेला झवेरी बाजार चमचमीत पदार्थांसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. तुम्ही जर पाणीपुरी, शेवपुरी, भजी, कचोरी, पापडी अशा चटपटीत पदार्थांच्या प्रेमात असाल तर झवेरी बाझार खाऊ गल्ली तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. अगदी २० ते ५० रुपयांत तुम्ही इकडे पोटभरून असे चटपटीत पदार्थ फस्त करू शकता. या विभागात गुजराती समाज अधिक असल्याने तुम्हाला पापडी, खाकरा, कचोरी, पुडला, मुंग डाल, पापडी असे गुजराती डीशही चाखायला मिळेल.

प्रिन्सेस स्ट्रीट खाऊ गल्ली

कळबादेवीतल्या मंगलदास मार्केटच्या अगदी मागच्या बाजूला असलेली गल्ली म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट खाऊ गल्ली. मंगलदास मार्केटमधून शॉपिंग करून कंटाळला असाल तर इकडे  येऊन पोटपूजा करा. सॅण्डवीच, बदाम बर्फी, आईस हलवा असे पदार्थ तुम्हाला इकडे चाखायला मिळतील. समोसा, डाल पक्वान याही पदार्थांचा आस्वाद घेता येईल. 

माहिम खाऊ गल्ली

अंड्याची चपाती (बैदा रोटी), सिख खिचडा (एक नॉनव्हेज पदार्थ) अशा मासांहारी पदार्थांसाठी माहिम खाऊ गल्ली फार प्रसिद्ध आहे. खाकसरून इकडे पर्यटक जास्त प्रमाणात येत असतात. इकडे मिळणारी चिकन तंदुरी लाजवाब आहे. बाबा फालूदा स्टॉलवर गेल्यावर मिक्स आईस्क्रीम फालूदा आणि ड्राय कुल्फी फालूदा एकदा चाखून पहाच. बाबा फालूदा स्टॉल हा माहिममधला सगळ्यात प्रसिद्ध फालूदा स्टॉल आहे. 

चेंबूर खाऊ गल्ली

सिंधी आणि पंजाबी डिश तुम्हाला चाखायची असेल तर तुम्ही चेंबूरच्या खाऊ गल्लीला भेट द्या. कोकी, कुलचास, डाल पक्वान, रगडा पॅटीस  असे पदार्थ तुम्हाला इकडे चाखायला मिळतील. या खाऊ गल्लीत गेल्यावर भट विश्रांती गृह, विग रिफ्रेशमेंट्स, साईनाथ ढाबा या स्टॉल्सना नक्की भेट द्या. 

 

टॅग्स :अन्नमुंबईमहाविद्यालय