Join us

कुलाबा, मुंबादेवी मतदारसंघ

By admin | Updated: September 26, 2014 21:40 IST

कुलाब्यात चौरंगी लढत

कुलाब्यात चौरंगी लढत
महायुतीत फूट पडल्याने दक्षिण मुंबईच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत रंगणार आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार ॲनी शेखर यांना याठिकाणी पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. शेखर यांची सद्यस्थिती पाहता त्यांना उमेदवारी देऊ नये, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधी नाराजी आणि अंतर्गत बंडाळीमुळे शेखर यांना ही निवडणूक जड जाणार आहे. याउलट भाजपतर्फे राज पुरोहित उभे यांना सोपी मानली जाणारी ही लढत शिवसेनेच्या पांडुरंग सपकाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अडचणीची झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अरविंद गावडे यांना याठिकाणी पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्याची मनसेची अवस्था पाहून याठिकाणी मनसेचा विजय अशक्य मानला जात आहे. याउलट काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पाहता शिवसेना आणि भाजपचे पारडे याठिकाणी अधिक जड मानले जात आहे.
..............

मुंबादेवीत काँग्रेसला मनसे, भाजपची काटे की टक्कर
मुंबादेवीतील काँग्रेसचे विद्यमान आमदार अमिन पटेल यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इम्तियाज अनिस आणि भारतीय जनता पार्टीचे अतुल शहा यांचे कडवे आव्हान आहे. कालपर्यंत शिवसेनेचे पांडुरंग सपकाळ यांची उमेदवारी याठिकाणी निश्चित मानली जात होती. मात्र महायुती तुटल्यानंतर सकपाळ यांचे उमेदवारी क्षेत्रच बदलण्यात आले. आता सपकाळ यांनी कुलाब्यातून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शनिवारी शेवटच्या दिवशी याठिकाणी शिवसेनेतून कोणाला उमेदवारी मिळेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. शुक्रवारी भाजपचे अतुल शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर मनसेचे इम्तियाज अनिस शनिवारी येथून अर्ज दाखल करतील. याउलट मुस्लिमबहुल परिसर असलेल्या मुंबादेवीत पटेल यांचे वर्चस्व मानले जात आहे. मराठी मतांचे विभाजन झाले नाही, तर मनसेला याठिकाणी उसंडी मारण्याची शक्यता आहे. शिवाय शहा यांचे मुस्लिम मतदारांसोबत चांगले संबंध असल्याने पटेल यांना ही निवडणूक सोपी नाही.
....................