Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुलाबा, माझगाव, बीकेसी, चेंबूर, मालाड, बोरीवली आणि नवी मुंबई प्रदूषितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतल्या प्रदूषणाचा वाढता आलेख बुधवारीही कायम हाेता. कुलाबा, माझगाव, बीकेसी, चेंबूर, मालाड, बोरीवली आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतल्या प्रदूषणाचा वाढता आलेख बुधवारीही कायम हाेता. कुलाबा, माझगाव, बीकेसी, चेंबूर, मालाड, बोरीवली आणि नवी मुंबई प्रदूषितच नोंदविण्यात आली. येथील हवा वाईट आणि अत्यंत वाईट या वर्गात नोंदविण्यात आली. कमाल तापमान ३४.६ तर किमान तापमान २२ अंश नोंदविण्यात आले. तापमानाच्या नोंदीनुसार कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. तत्पूर्वी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, १६ अंशाच्या आसपास होते.

कर्नाटकपासून महाराष्ट्राच्या किनारी भागापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्वेकडून वारे वाहत होते. शिवाय थंडीचा जोर कायम असल्याने येथील वारे स्थिर होते. या दोन प्रमुख कारणांमुळे वातावरणातील धूलिकण स्थिर असल्याने मुंबईतील प्रदूषणाचा वाढता आलेख कायम होता. आता कमी दाबाचे क्षेत्र विरले असून, तापमानातही वाढ झाली आहे. मात्र असे असले तरी धूर, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धुरक्याने मुंबईला वेढले आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबई प्रदूषित नोंदविण्यात येत आहे.

* मुंबईतून थंडी गायब

मागील आठवडा पूर्णतः प्रदूषित नोंदविण्यात आला. चालू आठवड्यातही प्रदूषणाने आपला मारा कायम ठेवला. मुळात मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेले बांधकाम आणि इतर घटक यास कारणीभूत आहेत. यावर उपाययोजना करण्याबाबत प्रशासन कमी पडत आहे, अशी टीका सतत पर्यावरणतज्ज्ञ करत आहेत. दरम्यान, कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने मुंबईतील थंडी गायब झाली असून, किंचित का होईना मुंबईकरांना उन्हाचा तडाखा बसू लागल्याचे चित्र आहे.

------------------------