Join us  

कुलाबा बालिका हत्या प्रकरण :‘त्या’ विकृत मारेकऱ्याचे मुंबईत ६ महिन्यांपासून होते वास्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:09 AM

जादूटोणा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा

मुंबई : बालिकेला सातव्या मजल्यावरून खाली फेकून निर्घृण हत्या करणारा विकृत मारेकरी सहा महिन्यांपासून मोरक्को येथून मुंबईतील फ्लॅटवर वास्तव्याला आला होता. तांत्रिक शक्तीच्या करणीतून मुक्तीसाठी त्याने ३ वर्षांच्या शनाया हातरामानी हिला ९० फूट उंचीवरून फेकल्याची धक्कादायक बाब तपासातून पुढे आली आहे. त्याच्यावर सोमवारी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनायाच्या जुळ्या बहिणीलाही मारण्याचा आरोपी अनिल चुगानी याचा प्रयत्न होता.

अनिल चुगानीचा रेडिओ क्लब येथील ब्रह्मकुमारी मार्गावरील अशोका अपार्टमेंटच्या ए विंगमध्ये सातव्या मजल्यावर वडिलोपार्जित फ्लॅट आहे. त्याच्या शेजारी राहत असलेला प्रेमलाल हातरामानी याच्याशी बालपणापासून परिचित होता. काही वर्षांपासून तो कुटुंबीयांसमवेत मोरक्को येथे स्थायिक झाला होता. त्यानंतरही दरवर्षी दोन महिन्यांसाठी तो कुलाब्यातील फ्लॅटवर राहायला यायचा. या वेळी तो फेबु्रवारीच्या अखेरीस आला होता. वैफल्यग्रस्त अवस्थेत असलेल्या अनिलला आपल्यावर काळी जादू (ब्लॅक मॅजिक) झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी दोन बालिकांचा बळी देणे आवश्यक असल्याचा समज झाला होता. त्यासाठी ६ महिन्यांपूर्वी मुंबईत येऊन प्रयत्न सुरू केले होते.

या ठिकाणी आल्यानंतर त्याने मित्र प्रेमलाल याच्या लहान मुलींचा बळी देण्याचे ठरविले. त्यानुसार शनिवारी सायंकाळी त्याने आपल्याला एकटेपणा वाटत असल्याचे सांगून तिच्या तीनही मुलांना फ्लॅटमध्ये खेळण्यासाठी पाठवून देण्याची विनंती केली.

त्यानुसार त्यांनी सहा वर्षांची जाई, श्रीया व शनाया या ३ वर्षांच्या मुलींना पाठवून दिले. अनिल त्याच्या समवेत खेळण्याचे नाटक करू लागला. तिघींना गुंगीचे औषध घातलेले चॉकलेट खाण्यास दिले. त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याने शनायाला उचलून घेत बेडरूममध्ये जाऊन खिडकीतून खाली फेकले. त्यानंतर तो पुन्हा हॉलमध्ये येऊन श्रीयाला उचलून घेतले असता ती जागी होऊन ओरडू लागल्यानंतर तिच्या बहिणीलाही जाग आली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात आला. अनिल चुगानी १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून या कृत्याबाबत आणखी माहिती घेतली जात आहे, त्याच्या कटात आणखी कोणी सहभागी आहे का, याचीही माहिती घेतली जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :खून