Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुणांकन प्रस्ताव रखडला

By admin | Updated: August 24, 2015 01:12 IST

वाहतुकीचे नियम तोडून वाहनचालक पुन्हा तोच तो गुन्हा सातत्याने करीत असल्याने अशा चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कठोर पाऊल

मुंबई : वाहतुकीचे नियम तोडून वाहनचालक पुन्हा तोच तो गुन्हा सातत्याने करीत असल्याने अशा चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी गुणांकन पद्धतीने गुन्ह्याचे स्वरूप ठरवून कठोर शिक्षा करण्यासाठी निर्णय घेतानाचा तसा प्रस्तावाही तयार करण्यात आला. या प्रस्तावानुसार ३0 गुणानंतर वाहन परवानाच रद्द होणार होता, तर ५0 गुणानंतर वाहन नोंदणीच रद्द होणार होती. मात्र आता हा प्रस्ताव लटकला असून, केंद्र सरकारकडून नव्याने होत असलेल्या वाहतूक नियमांच्या प्रस्तावावर वाहतूक पोलीस अवलंबून आहेत. सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे वाहन उभे करणे, हेल्मेट किंवा सीटबेल्टशिवाय वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे असे अनेक गुन्हे वाहनचालकांकडून केले जातात. या संदर्भात दिलेल्या प्रस्तावानुसार एखाद्या वाहनचालकाने पहिला गुन्हा केल्यास त्याच्यावर १० गुण जमा होतील आणि त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी अपात्र ठरेल, असे प्रस्तावात नमूद होते. अशा तऱ्हेने त्याने आणखी पाच वेळा गुन्हा केल्यास त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सबाबत वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद होती. मात्र ५0 गुण जमा झाल्यानंतर त्या वाहनचालकाची वाहन नोंदणीच रद्द केली जाणार होती. आॅक्टोबर २0१३ मध्ये हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर एक महिन्यातच तो गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर या प्रस्तावावर काहीही हालचाली होताना दिसल्या नाहीत.