Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील विविध कोळीवाड्यांत नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:08 IST

मुंबई- सोन्याचा नारल वाहिन मी तुला !! हे देवा तारु येऊ दे बंदराला!! कोळी बांधवांनी अथांग सागरला अशी ...

मुंबई- सोन्याचा नारल वाहिन मी तुला !! हे देवा तारु येऊ दे बंदराला!! कोळी बांधवांनी अथांग सागरला अशी साद देत मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारवी, माहुल, कुलाबा येथील विविध कोळीवाड्यांत आज नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली.

कोळीवाड्यांमध्ये कोविडचे भान राखत मिरवणुका निघाल्या. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत वेसावे कोळीवाड्यातील विविध गल्लींच्या अध्यक्षांनी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण केला, तर समुद्रात भरपूर म्हावंर लागू दे, आमच्या बोटी सुखरूप किनारी येऊ दे, अशी मनोभावे सागराचे पूजन करून कोळी महिलांनी प्रार्थना केली, अशी माहिती वेसावे कोळीवाड्यातील मोहित रामले यांनी दिली.

मढ कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. सायंकाळी नारळी पौर्णिमेच्या मिरवणुका वाजतगाजत निघाल्या. येथील समुद्रकिनारी कोळी बांधवांनी आणि महिलांनी गर्दी केली होती, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी ही माहिती दिली.

मत्स्य दुष्काळ व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे मच्छीमारी मोठी संकटातून बाहेर पडत असताना असतानाच दादर व शिवाजी मंडईमधून मासे विक्रेता महिलांना विस्थापित करण्याचे दुःखाचे सावट असल्याने नारळी पौर्णिमा उत्सव कोळी समाजाच्या भावनांचा उद्रेक असल्याची भावना मुंबईतील विविध कोळीवाड्यांमध्ये दिसून आले.

नारळ समुद्रात अर्पण करताना आपण मुंबईचे मूळ भूमिपुत्र असूनही या राजकीय व्यवस्थेने आम्हास अस्तित्वहीन करण्याचे षड्यंत्र आखले असल्याची खंत वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय व कोळी महासंघाचे सरचिटणीस

राजहंस टपके यांनी दिली.

----------------------------------------