लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टांझानियन नागरिकाकडून खार परिसरातून ५१ लाख २५ हजार रुपयाचे २०५ ग्रॅम कोकेन मंगळवारी जप्त करण्यात आले. निको पिऊस जॉन (६०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, अमली पदार्थ विरोधी विभागाच्या (एएनसी) वांद्रे पथकाने ही कारवाई केली.
खार पश्चिमेकडील लिंकिंग रोड परिसरात मंगळवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी पावणेएकच्या सुमारास निको पिऊस जॉन हा संशयास्पद हालचाली गस्तीवर असलेल्या पथकाच्या नजरेत पडला. त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ५१ लाख २५ हजाराचे २०५ ग्रॅम कोकेन सापडले. जॉनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताे मूळचा टांझानियाचा रहिवासी आहे.
वांद्रे पथकाचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ही मंडळी कपडे व्यवहाराच्या नावाखाली उच्चभ्रू वस्त्यांमध्ये छुप्या पद्धतीने ड्रग्जची तस्करी करीत असल्याचे एएनसीने सांगितले. याप्रकरणी वांद्रे पथकाकडून अधिक तपास सुरू आहे.