Join us  

संगीत क्षेत्रातला 'शुक्रतारा' निखळला : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 9:48 AM

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनानं मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.मराठी रसिकांमध्ये भावगीतं लोकप्रिय करण्यात श्री. दाते यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजाचा साज ल्यालेली अनेक गाणी अजरामर झाली असून त्यात विशेषतः  भातुकलीच्या खेळामधली  राजा आणिक राणी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत.  त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू  निखळला आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी अरुण दाते यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. 

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन झालंय. आज सकाळी सहा वाजता कांजूरमार्ग येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता सायन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 4 मे रोजी त्यांचा 84 वा वाढदिवस होता. या निमित्तानं पुण्यात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती ठिक नसल्यानं ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. 

टॅग्स :arun date