Join us

‘ती’ क्लिप पोलीस आयुक्तांकडे दिली

By admin | Updated: June 18, 2015 02:47 IST

शाळेसारख्या ठिकाणी आणि तेही भाषणामध्ये अख्खं गँगवॉर माझ्यासोबत असतं, अशी मुक्ताफळे उधळणारे आमदार अशोक पाटील यांच्याबाबत

मुंबई : शाळेसारख्या ठिकाणी आणि तेही भाषणामध्ये अख्खं गँगवॉर माझ्यासोबत असतं, अशी मुक्ताफळे उधळणारे आमदार अशोक पाटील यांच्याबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. पक्ष म्हणून शिवसेना काय कारवाई करणार, हेदेखील महत्त्वाचे आहे. शिवाय ‘ती’ आॅडिओ क्लिप पोलीस आयुक्तांकडे सुपुर्द करण्यात आल्याने पोलिसांच्या भूमिकेकडेही भांडुपकरांचे लक्ष लागलेले आहे. भांडुपमध्ये आजही अंडरवर्ल्ड आणि त्यातल्या संघटित गुन्हेगारी टोळ््यांचे अस्तित्व आहे. त्यामुळे भांडुपमध्ये वेळोवेळी वर्चस्वाच्या संघर्षातून या टोळ््यांचे गँगवॉर उफाळून येत असते. अलीकडेच कुख्यात कुमार पिल्ले टोळीचा गँगस्टर अनिल पाण्डेची हत्या करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेने काण्या संतोष टोळीचा शूटर अनिल रांबाडे ऊर्फ गुज्जी याला भांडुपमधूनच गजाआड केले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भांडुप पोलीस ठाण्यात तीनशेहून जास्त गुन्हे दाखल झाले आहेत, हे विशेष. त्यापैकी निम्म्याहून अधिक गुन्हे गँगवॉरचे आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांचे भाषणातील वक्तव्य गंभीर स्वरूपाचे असल्याची प्रतिक्रिया भांडुपमधून उमटत आहे.आमदार होण्याआधी पाटील भांडुपच्या १११ वॉर्डचे नगरसेवक होते. अद्यापही त्यांनी नगरसेवकपद सोडलेले नाही. बेस्ट समितीच्या अध्यक्षपदीही ते होते. ‘मातोश्री’शी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या पाटील यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. ही पार्श्वभूमी त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केली आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याविरोधात एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. त्यात अवैधपणे शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी धमकावणे अशा गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. पाटील यांच्या भाषणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. सोबत पाटील यांच्या भाषणाच्या आॅडिओ क्लिपच्या सीडीदेखील सुपुर्द करण्यात आल्या आहेत. गणपती मंडळांची खुन्नस !भांडुपच्या जय भवानी, उत्साही या सार्वजनिक मंडळांमधल्या वैमनस्यातून जन्माला आलेल्या अनेक संघटित गुन्हेगारी टोळ््या भांडुपवासीयांनी पाहिल्या आणि त्यांचे दुष्परिणामही भोगले. कुमार पिल्ले टोळीचा शूटर अमित भोगले, मयूर शिंदे, काण्या संतोष, अनिल रामसेवक पाण्डे हे कालपरवाचे गँगस्टर. यापैकी काण्या संतोषची हत्या भोगलेने घडवली. त्याचा बदला घेण्यासाठी काण्याचा नंबरकारी रांबाडे ऊर्फ गुज्जीने हत्यार उपसले. पाण्डेची हत्या स्थानिकांनी मिळून केली. किरकोळ कारणांवरूनही खून!अवैध बांधकामे, छोट्यामोठ्या व्यावसायिकांकडून उकळली जाणारी खंडणी, हत्या, मरेपर्यंत मारहाण असे गुन्हे या टोळ््या रोजच्या रोज भांडुपमध्ये करतात. यातून सर्वसामान्य जनता आणि त्यांची शाळेत शिकणारी मुले भरडली जातात. ‘तू त्याच्यासोबत का बोललास’, अशा कारणांवरूनही भांडुपमध्ये खून झालेले आहेत. भांडुपमधल्या प्रत्येक टोळीला राजकीय वरदहस्त आहे. कोणत्या ना कोणत्या स्थानिक पुढाऱ्याशी ही टोळी संबंधित असून, गुन्ह्यानंतर पोलीस ठाण्यात या पुढाऱ्यांचे फोन खणखणतात. त्यात एका माजी मंत्र्याचाही सहभाग आहे. राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अद्दल घडविण्यासाठी या माजी मंत्र्याने भांडुपच्याच संघटित गुन्हेगारी टोळीला हाताशी धरले होते. या टोळीचा कोणालाही कोणत्याही गुन्ह्यात पकडले तर लगेच या नेत्याच्या कार्यालयातून भांडुप पोलीस ठाण्यात फोन येत असत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भांडुपचे गँगवॉर : भांडुपवासीयांना अंडरवर्ल्ड, गँगवॉर नवे नाही. ९०च्या दशकापासून भांडुपमध्ये अशोक जोशी, विलास माने, अवधूत बोंडे, अनिल परब अशा गँगस्टर्सचे वास्तव्य आणि वावर होता. शिवसेनेचे लोकप्रिय नगरसेवक खिमबहादूर थापा ऊर्फ केटी थापांची हत्याही अंडरवर्ल्डच्या गँगवॉरमधूनच झाली.