Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिपाई झाले क्लार्क

By admin | Updated: June 17, 2014 01:37 IST

ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ५६ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी लिपीक (क्लार्क) पदी बढती मिळाली आहे

ठाणे : ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ५६ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी लिपीक (क्लार्क) पदी बढती मिळाली आहे. कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, परंतु तुमच्याकडे जर शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्ही वरच्या श्रेणीत जाऊ शकतात. हेच यातून सिद्ध झाले असून आता या टेबलावरुन त्या टेबलावर चहा, पाणी, फाइल्स पोहोचविणाऱ्या या कर्मचाऱ्यांनाच आता हक्काचे टेबल मिळाले आहे.ठाणे महापालिकेतील बिगारी तसेच शिपाईपदावर कार्यरत असणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व काय असते, हे दाखवून दिले आहे. गेली कित्येक वर्षे शैक्षणिक अर्हता असूनसुद्धा ते चतुर्थ श्रेणीचे काम करीत होते. परंतु आता त्यांना क्लार्कपदी बढती मिळाल्याने त्यांना त्यांच्या शिक्षणाचे मोलसुद्धा समजले आहे. यातील बहुतेक कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या सेवेत असताना अभ्यासाच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले असून त्याचे फळ आता त्यांना मिळाले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेने वर्षभरात अभियंता, लिपीक तसेच अन्य पदांंवर कार्यरत असणाऱ्या ४०० हून अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना बढती देऊ केली आहे. दहावी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, चतुर्थश्रेणीमध्ये तीन वर्षे सलग सेवा पूर्ण झालेले आणि टंकलेखनातील आवश्यक गती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लिपीकपदावर पदोन्नती देण्याता निर्णय यापूर्वीच घेतला होता. मात्र, त्यामध्ये मराठी तसेच इंग्रजी, अशा दोनही भाषेत टंकलेखन येणे बंधनकारक होते. दरम्यान राज्य शासनाने या निर्णयामध्ये नुकताच बदल केला असून त्यामध्ये मराठी किंवा इंग्रजी, यापैकी एका भाषेत टंकलेखन येणे बंधनकारक केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने चतुर्थश्रेणीतील ७० कर्मचाऱ्यांना बढती देण्याचा निर्णय घेतला. पैकी ५६ कर्मचाऱ्यांच्या बढतीचे आदेश काढण्यात आले असून उर्वरित १४ कर्मचाऱ्यांची कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे त्यांना अद्याप बढती मिळू शकलेली नाही. मात्र, कागदपत्रांची पूर्तता होताच त्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा होणार आहे. लिपीकपदी बढती मिळालेल्या सर्वांना पुढील दोन वर्षांत एमएससीआयटीचे संगणक प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा त्यांना त्यांच्या मूळ पदावर काम करावे लागणार आहे. महापालिका मुख्यालय, प्रभाग समित्या, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, उद्याने आदी ठिकाणी बढती मिळालेले ५६ कर्मचारी कार्यरत आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली. (प्रतिनिधी)