Join us  

बाप्पाच्या दर्शनात चोरांची हातसफाई; लालबाग, दादर भागात मोबाइल केले लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:40 PM

बाप्पाच्या गर्दीत चोरट्यांची हातसफाई सुरू असून दादर, लालबाग भागातील गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांची लगबग

मुंबई :

बाप्पाच्या गर्दीत चोरट्यांची हातसफाई सुरू असून दादर, लालबाग भागातील गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांची लगबग वाढल्याचे पोलिसांत दाखल होणाऱ्या घटनांमधून समोर येत आहे. कुठे मोबाइल चोरी, तर कुठे थेट गाडीच्या काचा फोडल्या आहेत.  

शिवाजी पार्क पोलिसांनी केलेल्या कारवाईत लालबागचा राजा आणि सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या किमती ऐवजावर डल्ला मारणाऱ्या चौकडीवर कारवाई केली आहे. राणी साळुंके या महिलेला अटक केली असून, तिच्याकडून चोरीची सोनसाखळी जप्त केली आहे. तिच्या सोबत असलेल्या तीन अल्पवयीन मुलींना बालगृहात पाठविण्यात आले. चोरीच्या उद्देशाने ही चौकडी गुजरातहून मुंबईत आली. तक्रारदार या दादर ब्रिजवरून टॅक्सीने जात असताना काही जणी त्यांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आले. तसेच, महिलेच्या मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि २० हजार रुपयेही गायब असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना सांगताच, मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा, राणीने चोरी केल्याची कबुली दिली. 

लालबाग भागातही गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी २० तारखेला उच्च न्यायालयात नोकरीला असलेल्या तरुणाच्या किमती ऐवजावर हात साफ केला. त्यापाठोपाठ मुलासाठी सदरा घेण्याकरिता आलेल्या तरुणाचे चिंचपोकळी परिसरात चोरट्याने पाकीट चोरी केले. तक्रारदाराच्या सतर्कतेमुळे एक चोर त्यांच्या हाती लागला.  काळाचौकी पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. 

मोबाइल लोकेशनमुळे चोरटे झाले ट्रेसमालाडचा हार्दिक सर्वैया (३४) हा नातेवाइकांकडे पूजा उरकून लालबागला जात असताना मोबाइल चोरल्याचे समजले. मोबाइलचे लोकेशन ऑन असल्यामुळे त्याने लोकेशनच्या आधारे शोध घेतला. तेव्हा दुचाकीवर बसलेल्या त्रिकुटाच्या हातात त्याचा मोबाइल दिसला. त्याने तो खेचण्याचा प्रयत्न करताच आरोपी पसार झाले. तरुणाने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांच्या मदतीने शिवडी भागात तिघे सापडले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत फोन सापडला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

कारमधील लॅपटाॅप केला लंपास मुलुंडचे रहिवासी असलेले अमित कुमार (४२)  हे एका बड्या कंपनीत नोकरीला आहेत. २२ तारखेला ते सहकाऱ्यासोबत लालबागच्या दर्शनासाठी आले. गाडी जवळच पार्क करून दर्शनासाठी गेले. दर्शन घेऊन गाडीकडे येताच गाडीच्या काचा फुटलेल्या दिसल्या. तसेच, कारमधील लॅपटॉप, मोबाइल चोरीला गेल्याचे दिसून आले. याप्रकरणी काळाचौकी पोलिस तपास करत आहेत. 

टॅग्स :लालबागचा राजामुंबई